सांगली : ऊसतोडीसाठी मजूर पुरवतो असे सांगून ११ लाख ९६ हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पद्माळे (ता. मिरज) येथील शेतकरी रमेश पांडुरंग पाटील यांनी मुकादम आसाराम गोपीचंद भिल (रा. नंदाणी, ता.जि. धुळे) याच्याविरूद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.अधिक माहिती अशी, धुळे जिल्ह्यातील मुकादम आसाराम भिल याने २०२१ पासून दोन वर्षे गळीत हंगामात ऊसतोड मजूर पुरवून पद्माळे येथील शेतकरी रमेश पाटील यांचा विश्वास संपादन केला. आसाराम याच्याकडून ३ लाख ६६ हजार रूपये येणे बाकी असल्यामुळे शेतकरी पाटील यांनी २०२३-२४ च्या गळीत हंगामास ऊसतोडीसाठी कामगार पुरवावेत म्हणून प्रत्येकी ५० हजार रूपयेप्रमाणे ११ जोड कामगार (एकुण २२) ११ लाख रूपये नोटरी करार केला. आसाराम याने मागील येणे रक्कम आणि बँकेमार्फत स्विकारलेले ११ लाख ९६ हजार रूपये घेतल्यानंतरही पाटील यांना मजूर पुरवले नाहीत. वारंवार पाठपुरावा करूनही आसाराम याने मजूर न पुरवता फसवणूक केली. त्यामुळे पाटील यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. नवीन कायद्यापूर्वीचे हे प्रकरण असल्यामुळे भारतीय दंड विधान कलम ४०६, ४२० नुसार सांगली ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Sangli: मजूर पुरवतो सांगून पद्माळेत १२ लाखाची फसवणूक, धुळे येथील मुकादमाविरूद्ध गुन्हा दाखल
By घनशाम नवाथे | Published: July 06, 2024 1:08 PM