विटा : शेअर मार्केटमध्ये ११ महिन्यात दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून आळसंद (ता.खानापूर) येथील शिवराज बाळासाहेब भोसले (वय ४१) यांना ८ लाख ७ हजार ५०० रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी संशयित ठकसेन सूरज पांडूरंग जाधव व पांडूरंग एकनाथ जाधव (दोघेही रा. गुरसाळे, ता.खटाव, जि. सातारा) या पिता-पुत्रावर विटा पोलिसांत गुरूवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.आळसंद येथील शिवराज भोसले यांच्या मित्राची गुरसाळे येथील सूरज व पांडूरंग जाधव या पिता-पुत्राची ओळख होती. त्या मित्रानेच भोसले यांची ओळख संशयित पिता-पुत्राशी करून दिली. त्यातूनच भोसले व संशयित सूरज या दोघांचा फोनवरून संपर्क होऊ लागला. त्यावेळी सूरजने मी शेअर मार्केटचे काम करीत असून माझे मुंबईतील खारघर येथे कार्यालय आहे. आमच्याकडे लोकांनी सुमारे ४ कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे. तुम्हीही गुंतवणूक करा, तुम्हाला ११ महिन्यात सर्व रक्कम दामदुप्पट देण्याचे आमिष संशयित सूरज व त्याचे वडील पांडूरंग जाधव या दोघांनी भोसले यांना दाखविले.या आमिषाला बळी पडून भोसले यांनी दि. १० जानेवारी २०२१ ते दि. ६ एप्रिल २०२१ या कालावधीत जाधव पिता-पुत्राला स्टेट बॅँकेच्या विटा शाखेतून धनादेशाव्दारे ५ लाख रूपये व त्यानंतर वेळोवेळी रोख स्वरूपात ३ लाख ७ हजार ५०० असे एकूण ८ लाख ७ हजार ५०० रूपये दिले. या रक्कमेची ११ महिन्याची मुदत संपल्यानंतर भोसले यांनी पिता-पुत्राकडे त्यांनी गुंतवणूक केलेली दामदुप्पट रक्कम मागितली. त्यावेळी या पिता-पुत्राने वेगवेगळी कारणे सांगून त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली.फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शिवराज भोसले यांनी गुरूवारी रात्री विटा पोलीसांत सूरज पांडूरंग जाधव व त्याचे वडील पांडूरंग एकनाथ जाधव या पिता-पुत्राविरूध्द ८ लाख ७ हजार ५०० रूपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत चव्हाण पुढील तपास करीत आहेत.
सांगली: दामदुप्पटचे आमिष, आळसंदच्या एकाला ८ लाखांचा गंडा; साताऱ्यातील दोघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2022 4:08 PM