सांगली : जडीबुटी व दैवीशक्तीने पैशाचा पाऊस पाडतो असे आमिष दाखवून एका दाम्पत्यासह पाच जणांनी सोलापूर जिल्ह्यातील एकाची १५ लाख रुपयाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.याप्रकरणी ओबीसी संघटनेचे बादशहा इस्माईल पाथरवट (वय ४०), पत्नी आसमा पाथरवट (३५, रा. सांगली), शिवानंद शरणाप्पा हाचंगे (६०, विडी घरकुल, सोलापूर), शंकर (महाराज) जाधव (पत्ता नाही) आणि तीन अनोळखी जणाविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पाथरवट दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सुनील मोतीलाल व्हटकर (वय ५७, बुधवार पेठ, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.अधिक माहिती अशी, सुनील व्हटकर हे शेतकरी आहेत. घरगुती अडचणीवर तोडगा काढण्यासाठी त्यांना एकाने सोलापूर येथील शंकर जाधव या महाराजाकडे नेले. महाराजाने त्यांची समस्या विचारून घेतल्यानंतर पैशाची अडचण आहे काय? असे विचारले. तेव्हा व्हटकर यांनी अडचण असल्याचे सांगताच पैशाचा पाऊस पाडून देऊ शकतो असे सांगितले. खात्री करण्यासाठी म्हणून महाराजाने मोबाईल व्हिडिओ कॉलवरून सांगलीतील बादशहा पाथरवट याच्याशी संपर्क साधला. तेव्हा महाराज पैशाचा पाऊस पाडतात असे त्याने सांगितले. व्हटकर यांना सांगलीत बोलवून घेतले.व्हटकर ९ जून रोजी सांगलीत आल्यानंतर पाथरवट पती-पत्नीला भेटले. तेथून त्यांना अंकली फाट्यावर नेले. जडीबुटी आणावी लागेल असे सांगितले. तेथे आणखी तिघेजण होते. त्यांनीदेखील ‘महाराज पैशाचा पाऊस पाडतात’ असे सांगितले. त्यांनी २५ लाख रूपये पैशाची मागणी केली. व्हटकर यांच्याकडे १५ लाख रूपये असल्यामुळे तेवढी रक्कम दिली. त्यानंतर सर्वांनी महाराज सांगलीत खणभाग येथे येणार असल्याचे सांगून व्हटकर यांना सांगलीत आणले. तेथे महाराज काही आले नाहीत. त्यांचा मोबाईल बंद लागला. त्यानंतर व्हटकर यांनी महाराजांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. महाराजांशी संपर्क होऊ शकला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्हटकर यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.
पैशाचा पाऊस पाडतो म्हणून १५ लाखांची फसवणूक, भोंदूमहाराजासह सात जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 1:42 PM