मिरजेत रेल्वे व बस स्थानक परिसरात परगावच्या प्रवाशांना कोणत्याही रोगावर हमखास इलाज होत असल्याचे भासवत काही आयुर्वेदिक औषध दुकानांत नेऊन महागडी औषधे गळ्यात मारण्यात येतात. यासाठी रस्त्यावर बसून किरकोळ साहित्य विक्री करणारे एजंट सक्रिय आहेत. कर्नाटकातील एका व्यक्तीस ८० हजाराची औषधे विकण्यात आली. संबंधितास आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने पोलिसांत धाव घेतली. प्रकरण अंगलट आल्याने औषध विक्रेत्यांनी संबंधितास पैसे परत देऊन प्रकरण मिटविले.
मिरजेत उपचारासाठी येणाऱ्या परराज्यातील व परजिल्ह्यातील रुग्णांना व नातेवाईकांना सर्व रोगावर उपयुक्त देशी औषध असल्याचे सांगून महागडी व कोणताही उपयोग नसलेली औषधे विक्री करून फसवण्यात येत आहे. यासाठी एसटी व रेल्वे स्थानक परिसरात कंगवे विकणाऱ्या महिला या गरजूंना ठराविक औषध दुकानात नेऊन महागडी, बोगस औषधे त्यांच्या गळ्यात घालतात. फसवणुकीची तक्रार पोलिसांत झाल्यास संबंधितास पैसे परत देऊन प्रकरण मिटविण्यात येते. यामुळे फसवणुकीच्या या प्रकाराबाबत पोलिसांत नोंद होत नसल्याची माहिती मिळाली.