कुपवाड : मानमोडी (ता. मिरज) येथील प्रदीप राजाराम मुळीक या लष्करी जवानाची मोबाईल कार्ड केवायसीच्या नावाखाली नऊ लाख १४ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. याबाबत कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात मोबाईल क्रमांकाच्या आधारावरून अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
याबाबत एमआयडीसी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फसवणूक झालेले जवान मुळीक हे सुटीनिमित्त मानमोडी येथे गावी आले होते. यादरम्यान त्यांना तुमच्या मोबाईलच्या सिम कार्डची पडताळणी प्रलंबित आहे, असे अज्ञात व्यक्तींकडून सांगण्यात आले. सिम कार्डची पडताळणी न केल्यास तुमचे कार्ड बंद होईल असा संदेश त्यांना माेबाईलवर मिळाला. त्यानंतर मुळीक यांनी संबंधित व्यक्तीशी संपर्क साधल्यानंतर केवायसी नाेंदणी प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.
सिम कार्ड बंद होईल या भीतीने मुळीक यांनी त्यांना केवायसी संबंधित कागदपत्रे दिली. त्यानंतर त्यांनी ७ डिसेंबर २०२१ ते १० डिसेंबर २०२१ रोजीच्या दरम्यान मुळीक यांच्या तसेच त्यांच्या आईच्या बँक खात्यातून ९ लाख १४ हजार ३५७ रुपये शिल्लक व कर्ज स्वरूपात काढून घेण्यात आले. हा प्रकार लक्षात येताच मुळीक यांनी त्वरित कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन माेबाईल क्रमांक देत अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दिली. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.