मालगावची लोकसंख्या ४० हजारांपर्यंत पोहोचली आहे. सध्या गावात कोरोनाचा वाढता फैलाव चिंता वाढविणारा आहे. आरोग्य पथकाचे वैद्यकीय अधिकारी बी. टी. पवार व त्यांचे सहकारी वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत. बरे होणाऱ्या संख्येइतकी बाधितांची संख्या वाढत असल्याने सरपंच अनिता क्षीरसागर, उपसरपंच तुषार खांडेकर, तलाठी एस. बी. खरात, ग्रामविकास अधिकारी सुनील कोरे यांनी कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी प्रा. विजयकुमार पाटील व मुख्याध्यापक अर्जुन सावंत यांच्या मदतीने एस. एम. हायस्कूलमध्ये संस्था विलगीकरण कक्ष सुरू केला आहे. शासनाच्या मदतीशिवाय हा कक्ष सुरू आहे.
कक्षात दक्षिण भारत जैन सभेच्या बोर्डिंगचे सचिव व ग्रामपंचायतीचे सदस्य अजित भंडे यांनी ३० बेडची व्यवस्था केली आहे.
शिवाजी माळी, राजू हारगे, रवींद्र क्षीरसागर यांनी भोजनाचे साहित्य, शाश्वत फाउंडेशनचे गणेश शिंदे व पुष्पा शिंदे यांनी आशा वर्करसाठी बॅगा, सॅनिटायजर, औषधे, स्वप्नील माने, गोमटेश भोकरे, दशरथ पवार यांनी पीपीई किट, मास्क, हातमोजे दिले आहेत. उपचारासाठी आरोग्य अधिकारी पवार यांच्या टीमकडून दिवसातून दोन वेळा उपचाराची सोय असताना बाधित व संपर्कातील संशयित गावात मोकाट फिरत आहेत. सध्या बाधितांची ३०० इतकी संख्या आहे. मोकाट फिरणाऱ्या बाधितांच्या बंदोबस्तासाठी कडक पावले उचलावी लागणार आहेत. सध्या विलगीकरण कक्षात १५ हून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. बाधित रुग्णांनी उपचारासाठी विलगीकरण कक्षात दाखल होण्याचे आवाहन केले आहे. मोकाट फिरणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.