विटा : खानापूर तालुक्यात शासनाकडील नियमित स्वरूपातील स्वस्त दरातील मे व जून या दोन महिन्यांतील गहू आणि तांदूळ हे धान्य रास्त भाव दुकानामार्फत मोफत देण्यात येणार असल्याची माहिती खानापूरचे तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी दिली. अंत्योदय आणि अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना हे धान्य मोफत वितरित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
तहसीलदार शेळके म्हणाले, लॉकडाऊन व संचारबंदीमुळे मे महिन्यातील अन्नसुरक्षा लाभार्थ्यांसाठी हे धान्य नियमित प्रमाणानुसारच प्रती माणसी तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ असे एकूण माणसी ५ किलो, तर अंत्योदय लाभार्थी कार्डधारकांसाठी नियमित प्रमाणानुसार गहू २५ किलो व तांदूळ १० किलो असे एकूण एका कार्डधारकास ३५ किलो धान्य मोफत देण्यात येणार आहे.
तसेच केेंद्र शासनाकडील पंतप्रधान गरीब कुटुंब कल्याण योजनेद्वारे मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही मे व जून या दोन महिन्यांकरिता अन्नसुरक्षा आणि अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना ऑनलाईन प्रणालीद्वारे प्रती माणसी गहू ३ किलो व तांदूळ २ किलो असे एकूण ५ किलो धान्य मोफत वितरित करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त जून महिन्यातील नियमित स्वस्त धान्य दरातील धान्यही वितरित केले जाणार आहे. तरी गरीब व गरजू अन्नसुरक्षा आणि अंत्योदय योजनेतून लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी केले.