सांगलीत रंगपंचमीनिमित्त तरुणाईने रंगांची मुक्त उधळण केली.
छाया : सुरेंद्र दुपटे
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : रंगपंचमीनिमित्त शहरभरात आज तरुणांनी रंगांची मुक्त उधळण केली. कोरोनाची फिकीर न करता रंगाने नखशिखांत न्हालेले तरुण दुचाकीवरून शहरभर फिरत होते. मुख्य रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त असल्याने उपनगरांतच रंगपंचमीचा उत्साह दिसून आला.
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे जमावबंदी लागू आहे, त्यामुळे तरुणवर्ग रंग उधळणीसाठी एकत्र येऊ नये याची काळजी पोलिसांनी घेतली. राममंदिर, बसस्थानक, विश्रामबाग, सिटी पोस्ट आदी ठिकाणी विशेष पोलीस पथके तैनात होती. त्यामुळे मुख्य रस्त्यांवर रंगांची उधळण झालीच नाही. गल्लीगल्ली मात्र रंगबाजी जोरात सुरू होती. काही ठिकाणी रंगांचे बॅरल भरून उधळण सुरू होती. गावभाग, संजयनगर, बुरूड गल्ली, वानलेसवाडी, गव्हर्नमेंट कॉलनी, वखारभाग, महावीरनगर आदी परिसरात सकाळी व संध्याकाळी रंगपंचमी साजरी झाली.
दुपारी मुख्य चौकांतील पोलीस बंदोबस्त मागे घेण्यात आला, त्यानंतर तरुण रस्त्यावर आले. महाविद्यालयांच्या कॅम्पसमध्येही रंगांची उधळण जोरात झाली. तरुणांना मास्कचा विसर पडला होता, सर्रास मास्क नाकाऐवजी तोंडावरच होते.