ओळ : विटा येथे नगरपरिषदेच्यावतीने सुरू होत असलेल्या कोविड रुग्णालयात सर्वसामान्यांवर मोफत उपचार व्हावेत, या मागणीचे निवेदन मनसेचे तालुकाध्यक्ष साजीद आगा यांनी मंगळवारी तहसीलदार ऋषिकेत शेळके यांना दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : विटा शहरात नगरपरिषदेच्यावतीने शासकीय निवासी शाळेत सुरू होत असलेल्या कोविड रुग्णालयासाठी पालिकेने कोणताही खर्च केला नाही. उलट लोकवर्गणी व दानशूर लोकांच्या मदतीतून हे कोविड रुग्णालय सुरू होत आहे. त्यामुळे या रुग्णालयात विटा शहरासह खानापूर तालुक्यातील सर्वसामान्य कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष साजीद आगा यांनी केली. याबाबतचे निवेदन मनसेच्यावतीने तहसीलदार ऋषिकेत शेळके यांना देण्यात आले.
तालुकाध्यक्ष आगा म्हणाले, विटा शहर व खानापूर तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी व रुग्णांवर उपचार करण्यासाठी विटा नगरपरिषदेने आयटीआय महाविद्यालयाजवळ असलेल्या निवासी शासकीय शाळेत ३८ बेडचे कोविड रुग्णालय सुरू करण्याची तयारी केली आहे.
परंतु हे रुग्णालय शासकीय इमारतीत उभे केले असून, त्यासाठी वीज, पाणी व सर्व व्यवस्था शासकीय आहे. गेल्यावर्षी कोरोनाच्या काळात नगरपालिकेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन तालुक्यातील सोने-चांदी गलाई व्यावसायिक व दानशून व्यक्तींनी सर्वसामान्य जनतेला फायदा होण्यासाठी रक्कम व ऑक्सिजन मशीन यासह अन्य साहित्य दिले आहे. ते साहित्य सध्या कोठे आहे, याचीही चौकशी करावी. विटा नगरपरिषदेने या रुग्णालयासाठी एक रुपयाही खर्च केलेला नाही. लोकसहभागातून मशीन व अन्य साहित्य मिळाले आहे. त्यामुळे नगरपालिका सुरू करीत असलेल्या कोविड रुग्णालयात विटा शहर व तालुक्यातील सर्वसामान्य रुग्णांना मोफत उपचार व्हावेत, अशी मागणीही यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष साजीद आगा यांनी तहसीलदार ऋषिकेत शेळके यांच्याकडे केली.