सांगली : राज्य शासनाने ब्रेक द चेन मोहिमेचे नवे निकष जाहीर करताना मालवाहतूकदारांना काहीसा दिलासा दिला आहे. कार्गो कुरिअर यांच्यासाठी जारी केलेल्या आरटीपीसीआर तपासणीच्या आदेशामध्ये बदल केला आहे.
नवीन आदेशानुसार वाहतुकीसाठी चालक, क्लीनर व आणखी एका सहायकाला परवानगी दिली आहे. महाराष्ट्रात प्रवेश करताना कर्मचाऱ्यांच्या तापमान व इतर लक्षणांच्या तपासणीतून सूट दिली आहे. आरोग्य सेतूवर त्यांच्या आरोग्यविषयक नोंदी पाहून प्रवेश दिला जाणार आहे. एखादा कर्मचारी सुरक्षित वाटला नाही तर जवळच्या आरोग्य केंद्रात पुढील तपासणीसाठी पाठवले जाईल. वाहतूक व्यवस्था अडचणीत सापडल्याच्या काळात या बदलाने दिलासा मिळाल्याची प्रतिक्रिया वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब कलशेट्टी, उपाध्यक्ष राजशेखर सावळे, सचिव प्रदीप पाटील यांनी व्यक्त केली.