सांगलीत रविवारी विश्रामबाग पोलिसांनी ट्रकचालकाला ई-पास नसल्याचे सांगत ५०० रुपये दंड ठोठावला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : माल वाहतुकीसाठी ई-पास गरजेचा नसल्याचे शासनाने स्पष्ट केले असतानाही पोलिसांकडून अडवणूक सुरु आहे. ट्रक चालकांकडून ५०० ते १००० रुपयाच्या पावत्या फाडल्या जात आहेत.
लॉकडाऊन काळात वाहतूक मंदावल्याने अन्न-धान्याच्या उपलब्धतेवर परिणाम झाला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती
आभाळाला भिडत आहेत. यावर नियंत्रणासाठी शासनाने माल वाहतुकीला मोकळीक दिला आहे. सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही या वाहनांना ई-पास गरजेचा नसल्याचे स्पष्ट केले आहे. अगदी देशभरात कोठेही वाहतूक करता येते. सांगली पोलिसांना मात्र या आदेशांची माहिती नसावी असे दिसत आहे.
रविवारी (दि. २३) मुंबईहून सांगलीला माल घेऊन आलेल्या ट्रकचालकाला (एमएच १०, सीएल २८७२) विश्रामबाग पोलिसांनी अडवून धरले. मिरजेला व्यापाऱ्याच्या गोदामाकडे माल घेऊन जात असताना सांगलीत बाजार समितीसमोर ट्रक अडवला. ई-पास नसल्याबद्दल दमबाजी केली. माल वाहतुकीसाठी त्याची गरज नसल्याचा खुलासा चालक नौशाद पिरजादे यांनी केला, परंतु पोलीस ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
पिरजादे यांनी संबंधित व्यापाऱ्याला फोन लावला, पण तोदेखील पोलिसांनी घेतला नाही. ५०० रुपयांची पावती करण्यास भाग पाडले. ती केल्यानंतरच ट्रक सोडला. पावतीवर कोरोनाचा उल्लेख केला, पण कोणत्या नियमाचा भंग केला याचा उल्लेख मात्र टाळला. पावत्यांचे टार्गेट पूर्ण करण्याच्या नादात पोलिसांकडून त्रास दिला जात असल्याची तक्रार वाहतूकदारांनी केली आहे.
कोट
वाहनचालकांची पोलीस अडवणूक करत असल्याच्या काही तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. माल वाहतुकीसाठी कोणत्याही प्रकारच्या ई-पासची गरज नसल्याचे शासनाने व सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पोलिसांनी अडवल्यास वाहनचालकांनी वाहतूकदार संघटनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी.
- बाळासाहेब कलशेट्टी, अध्यक्ष, सांगली जिल्हा माल वाहतूकदार संघटना