अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : भुयारी गटार योजनेचे काम ठप्प असल्याने शहरात रस्त्यांची कामे बंद आहेत. बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यावर वेळोवेळी मलमपट्टी केली जाते. लाखो रुपये खर्ची पडतात, मात्र पुन्हा ‘जैसे थे’ अवस्था येते.
नगरपालिकेतील मागील सत्ताधारी राष्ट्रवादीला इस्लामपूरची ‘बारामती’ करता आली नाही. भुयारी गटारी, चोवीस तास पिण्याचे पाणी, रस्त्यांचे रुंदीकरण, चौक सुशोभिकरण यांना गती देण्याचे धोरण असतानाच राष्ट्रवादीची पालिकेतील सत्ता गेली. युती शासनाने भुयारी गटार योजनेला मंजुरी दिली. मात्र त्याचे श्रेय सध्याच्या सत्ताधारी विकास आघाडीने लाटले; परंतु हे कामही अर्धवटच आहे. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.
जेथे भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण झाले आहे, तेथील रस्ते काही प्रमाणात झाले आहेत. हे सर्व रस्ते उपनगरातील आहेत. मात्र काही उपनगरांतील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे, तर चौकाचौकांतील रस्ते अपूर्णावस्थेत आहेत. मुख्यत: तहसील कार्यालय चौक ते बहे नाक्यापर्यंतचा रस्ता मृत्यूला आमंत्रण देणारा ठरला आहे. दुर्गा हॉटेलसमोर व त्याच्या बाजूच्या रस्त्यावर पडलेले खड्डे आणि रस्त्यावरच बसणारे फळ विक्रेते यामुळे नेहमीच अपघात होतात. तेथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, अनेकवेळा या रस्त्याची मलमपट्टी केली जाते, मात्र लगेच रस्त्याची अवस्था जैसे थे होते. रस्त्याची मलमपट्टी करण्याचा ठेका ठराविक ठेकेदारांनाच दिल्याने कामे निकृष्ट होत आहेत.
चौकट
रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी केवळ सात लाख
भुयारी गटारीच्या कामाला गती येण्याची शक्यता नाही. त्यामुळे रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पालिकेने सात लाख रुपयांची तरतूद केली आहे. यात शहरासह उपनगरातील रस्त्यांची दुरुस्ती होणार का, असा प्रश्न उपस्थित होतो. .