लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : चमचमीत, चटकदार पदार्थ खाण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. त्यामुळे बाहेरील असे पदार्थ खाताना त्यात वापरल्या जाणाऱ्या तेलाच्या पुनर्वापराचा धोका माहीत नसतो. खाद्यतेलाचा एकदा वापर केल्यानंतर ते पुन्हा वापरणे कायद्यानुसार गुन्हा तर आहेच, मात्र असे तेल आरोग्याच्या अनेक गंभीर समस्यांना जन्म देणारे ठरते.
कमी दर्जाच्या भेसळयुक्त अन्न पदार्थांची विक्री करणे किंवा खाद्यपदार्थ तळताना खाद्यतेलाचा वारंवार वापर करणे हे अन्न व सुरक्षा कायद्यानुसार नियमबाह्य आहे. त्यातून अनेक अपायकारक घटक पोटात जातात. त्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याची गरज आहे. दुसरीकडे नागरिकांनीही अशा खाद्यपदार्थांबाबत किंवा तेलाच्या वापराबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे.
चौकट
रस्त्यावरचे न खाल्लेले बरे
जिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी नागरिक रस्त्यावर उघड्यावर विक्री करणारे समोसे, कचोरी, भजी, वडा तसेच इतर पदार्थ आवडीने खातात. ते मोठ्या हॉटेलच्या तुलनेत स्वस्तसुद्धा मिळतात. मात्र, या ठिकाणी कमी दर्जाच्या तेलाचा वापर केला जातो तसेच तेलाचा आठ ते दहा वेळा पुनर्वापर केला जातो. त्यामुळे नागरिकांनी असे पदार्थ खाणे टाळलेलेच बरे
चौकट
तेलाचा पुनर्वापर आरोग्यासाठी धोकादायक
तेलामध्ये एकदा कोणताही पदार्थ तळला आणि त्यानंतर त्याच उरलेल्या तेलात दुसरा पदार्थ बनविला गेला, तर अशा तेलात फ्री रॅडिकल्स तयार होतात. हे रॅडिकल्स आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारशक्तींवर परिणाम करतात. अनेकदा या रॅडिकल्समुळे कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. एकदा वापरून झालेल्या तेलाचे पुन्हा-पुन्हा वापरल्याने ॲथोरोस्कलॉरोसिस होऊ शकतो, ज्यामुळे आपल्या शरीरातील कॅलेस्टोरेल वाढून धमन्या ब्लॉक होतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.
काेट
खाद्यतेलाचा पुनर्वापर करून तयार होणारे पदार्थ विकले जात असतात. त्याबाबत नागरिकांनी अत्यंत सतर्क राहिले पाहिजे. आरोग्यावर त्याचे अनेक दुष्परिणाम होत असतात. पोटाचे व अन्य विकार टाळायचे असतील तर असे पदार्थ टाळावेत.
- डॉ. संजय साळुंखे, जिल्हा शल्यचिकित्सक
कोट
केंद्र शासनाने वापरलेल्या खाद्यतेलाचा वापर बायोडिझेल म्हणून करण्यासाठी ‘रुको’ म्हणजेच रिपर्पज युजड् कुकिंग ऑईलची योजना आखली आहे. त्याचबरोबर अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी आवश्यक तपासणी यंत्रे नावीन्यपूर्ण योजनेतून खरेदीसाठी प्रस्ताव दिला आहे. - सुकुमार चौगुले, अन्न व औषध प्रशासन अधिकारी, सांगली
चौकट
कारवाईसाठी अडथळ्यांची शर्यत
खाद्यतेलाच्या पुनर्वापराविषयी तपासणी करणारे एकच यंत्र सध्या विभागीय स्तरावर एकच आहे. त्यामुळे तपासणीस अडथळे येत आहेत. तपासण्या होत नसल्याने गेल्या वर्षभरात अशा तेलाविषयी एकही कारवाई झाली नाही.