अशोक पाटीलइस्लामपूर : गत विधानसभा निवडणुकीत युतीच्या राज्यातील दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात येऊन सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यश मिळाले नसले तरी आता पुन्हा नव्याने महायुतीचे दिग्गज नेते इस्लामपूर मतदारसंघात येऊन गट मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. राष्ट्रवादीचेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या इस्लामपूर दौऱ्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्याही दौऱ्याचे नियोजन करण्यात येत आहे. राज्यातील दिग्गज नेत्यांचा सततचा हा राबता त्यांचे या मतदारसंघाबाबतचे मनसुबे स्पष्ट करणारा ठरत आहे.भाजप, शिवसेना यांच्यासह काही घटकपक्षही जयंत पाटील यांचे पारंपरिक विरोधक आहेत. त्यातच राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळे अजित पवारांच्या गटाचाही या विरोधकांमध्ये समावेश झाला आहे. प्रत्येक गटाचे नेतृत्व करणारे वेगवेगळे नेते आहेत.
इस्लामपुरात भाजपमध्येच जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, राहुल महाडिक, विक्रम पाटील यांचे वेगवेगळे गट आहेत. माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचीही रयत शेतकरी संघटना महायुतीचा भाग आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार यांचाही सवतासुबा दिसून येतो. युती पक्षातील सर्व नेते स्वयंभू असल्याचे मानतात. त्यांनी आपापले गट मजबूत करण्यासाठी शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे.इस्लामपुरात अजित पवार गटाचे नेतृत्व केदार पाटील यांच्याकडे आले आहे. त्यांचाही गट भाजपचा जय-जयकार करणारा आहे. सदाभाऊ खोत यांनीही इस्लामपुरात २२ रोजी सर्व घटक पक्षांचा मेळावा घेतला आहे. याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित केले आहे.
हुतात्मा संकुलाचे गौरव नायकवडी यांनाही पुन्हा विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. मात्र त्यांचे पक्षीय छत्र हरवले आहे. त्याच शोधात नायकवडी आहेत. २०२४ च्या विधानसभेला जयंत पाटील यांच्या विरोधात प्रतिस्पर्धी उमेदवार कोण? यावर युतीत मतभेद आहेत.