सांगली : केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात केंद्रीय कामगार संघटना संयुक्त कृती समिती आणि हिंद मजदूर सभेच्यावतीने गुरुवारी मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. मागण्या मान्य न झाल्यास सरकारविरोधात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. गुरुवारी देशव्यापी होत असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून हा मोर्चा काढण्यात आला होता.गुरुवारी निघालेल्या मोर्च्यात हिंद मजदूर सभा संलग्न हमाल तोलाईदार महिला माथाडी कामगार, घरेलू कामगार, बांधकाम कामगार आणि इतर असंघटित क्षेत्रातील कामगार एक दिवस काम बंद ठेवून सहभागी झाले होते.कामगार कायद्यात एकांगी स्वरुपाची दुरुस्ती करण्यात येऊ नये, मूलभूत कामगार कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करावी, असंघटित कष्टकऱ्यांना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळावी, केंद्र व राज्यातील सार्वजनिक उपक्रमांमध्ये निर्गंुतवणूक थांबविण्यात यावी, रोजगारांच्या संधी उपलब्ध करुन व त्यातून बेरोजगारी आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, महागाईला आळा बसण्यासाठी उपाययोजना राबविण्यात याव्यात आदी मागण्यांचे निवेदन यावेळी सादर करण्यात आले. या मोर्च्यात बापूसाहेब मगदूम, बाजार समितीचे संचालक बाळासाहेब बंडगर, माजी आ. शरद पाटील, गोविंद सावंत, विकास मगदूम, विद्या स्वामी यांच्यासह मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
कामगार धोरणाविरोधात मोर्चा
By admin | Published: March 10, 2016 10:49 PM