लोकमत न्यूज नेटवर्क
दुधगाव : मिरज पश्चिम भागातील कवेठपिरान व तुंग येथील ग्रामपंचायत निवडणुकांच्या तयारीला वेग आला आहे. या ग्रामपंचायतींमध्ये अर्ज दाखल करणे आणि विजयासाठी रणनीती आखणे याची मोर्चेबांधणी करण्यात प्रमुख पदाधिकारी व्यस्त झाले आहेत.
या दोन्ही गावांमध्ये एकतर्फी निवडणूक न होता, काटयाची टक्कर होण्याची चिन्हे दिसत आहेत. या गावात वेगवेगळ्या गटांना घेऊन पॅनेल तयार करण्यात येत आहे. ग्रामपंचायत काबीज करण्यासाठी नेते व कार्यकर्ते मोर्चेबांधणी करु लागले आहेत. याठिकाणी जातीपाती, भावकी व गटांचे राजकारण चालणार आहे.
तुंगमध्ये गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेसचे सचिन डांगे यांची सत्ता आहे. मागील एक निवडणूक डांगे गट व शेतकरी संघटना यांच्या एकत्रित पॅनेलने १३ विरुध्द ० अशी जिंकत निर्विवाद सत्ता मिळवली होती.
कवेठपिरानमध्ये हिंदकेसरी मारुती माने यांनी राजकारणाची सुत्रे हातात घेतल्यानंतर वर्षानुवर्षे गावातील सर्व संस्थांची निवडणूक बिनविरोध करून जिल्ह्यात एक वेगळा आदर्श निर्माण केला होता. चाळीस वर्षे ही परंपरा सुरु होती. त्यांच्या पश्चात गत पंचवार्षिकपासून याठिकाणी निवडणूक लढवली जात आहे. गेल्यावर्षी भीमराव माने यांच्याविरोधात निवडणूक लढवली गेली अन् बिनविरोधची परंपरा खंडित झाली. या निवडणुकीत विरोधकांच्या हाती काहीच आले नाही. परंतु, ४० टक्क्यांपर्यंत मतदान विरोधकांनी घेतले होते. त्यांच्या काही जागा थोड्या मतांनी निसटल्या होत्या.
चौकट
कवेठपिरानच्या निवडणुकीत बड्या नेत्याचे लक्ष
कवेठपिरान ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने लक्ष घातल्यामुळे निवडणुकीतील चुरस वाढली आहे. यावेळी मात्र सत्तेला काटशह देण्यासाठी राष्ट्रवादी व काँग्रेस हे एकत्र येऊन पॅनेल उभे करण्याची तयारी करत आहेत. गावातील पाटील गट एकत्र आल्यामुळे निवडणूक निश्चितच दुरंगी होण्याची चिन्हे आहेत.