अशोक पाटील - इस्लामपूर,वाळवा तालुक्याची ओळख क्रांतिकारी तालुका म्हणून आहे. आमदार जयंत पाटील ते स्थानिक पातळीवरील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांपर्यंत राजकारणात धक्का देण्याची खेळी येथे खेळली जाते. सध्या कृष्णा कारखाना उपाध्यक्ष पदाच्या निवडीवरून अंतर्गत धुसफूस सुरु आहे. कऱ्हाडच्या मानाने वाळवा तालुक्यातील सभासद संख्या कमी असतानाही, संचालक निवडीत वाळवा तालुक्याने आघाडी घेतली आहे. त्यामुळे उपाध्यक्ष पदावर वाळवा तालुक्याचाच हक्क आहे. निवडीवेळी वाळवा तालुक्याला डावलल्यास येथील संचालक आगामी काळात ‘जयंत राजनीती’तून काहीही करु शकतील, या चर्चेला चांगलाच ऊत आला आहे.अविनाश मोहिते यांच्या कारकीर्दीत वाळवा तालुक्यातील संचालकांचा चांगलाच दबदबा होता. त्यामुळेच उपाध्यक्षपद हे वाळवा तालुक्यातील सुरेश पाटील यांना दिले होते. तरीसुध्दा माजी संचालक डॉ. निवास पवार, अमोल गुरव आणि माधवराव पाटील यांनी बंड करुन अविनाश मोहिते यांना चांगलेच गोत्यात आणले होते. त्यामुळे कऱ्हाड तालुका बरा, पण वाळवा नको, असे म्हणण्याची वेळ अविनाश मोहिते यांच्यावर आली होती.शनिवारी कारखान्याच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडी होत आहेत. डॉ. सुरेश भोसले यांची अध्यक्षपदी वर्णी लागणार हे निश्चित आहे. वाद आहे तो फक्त उपाध्यक्ष पदाचा. निवडणुकीत चांगली कामगिरी करूनही वाळवा तालुक्यातील संचालकांना डावलण्याचा कट रचला जात आहे. हे पद विधानसभा निवडणुकीवेळी दिलेल्या आश्वासनापोटी कऱ्हाड तालुक्याला देण्याचा घाट घातला जात आहे. पुढील विधानसभेला वेगळे चित्र पाहावयास मिळेल, याचाही विचार डॉ. भोसले यांनी करणे गरजेचे आहे.कारखान्याच्या नूतन संचालक मंडळामध्ये सर्वपक्षीय संचालक आहेत. खुद्द पॅनेलप्रमुख भाजपचे, निम्म्याहून अधिक संचालक राष्ट्रवादीचे, तर उरलेल्यांमध्ये काँग्रेसचा नंबर लागला आहे. त्यामुळे भविष्यात राजकारणात काहीही घडू शकते.कऱ्हाड तालुक्यातील सभासदांच्या तुलनेत वाळवा तालुक्यात कमी सभासद असतानाही, येथे सहकार पॅनेलच्या सर्वच जागा कमी-अधिक मताने विजयी झाल्या. याचा उपाध्यक्षपद निवडताना प्रामुख्याने विचार होणे गरजेचे आहे. या पदावर बोरगाव येथील जितेंद्र पाटील, तांबवेचे लिंबाजी पाटील यांनी दावा केला आहे. निवडीवेळी याचा विचार न झाल्यास आगामी काळात ‘कृष्णा’वर काय राजकारण घडेल, हे सांगता येत नाही.कृष्णा कारखाना स्थापनेपासून उपाध्यक्षपद हे नेहमीच वाळवा तालुक्याला मिळत गेले आहे. यावेळचे उपाध्यक्षपद वाळवा तालुक्यालाच मिळणार आहे. जर या तालुक्याला डावलले, तर आमदार जयंत पाटील जो आदेश देतील, त्याप्रमाणे आम्ही कारभार करू. याचाही विचार पॅनेलप्रमुख डॉ. भोसले यांनी करावा.- लिंबाजी पाटील संचालक व जि. प. उपाध्यक्ष दोन उपाध्यक्षांचा पर्याय !
सुरेश भोसलेंसमोर उपाध्यक्ष निवडीचे आव्हान
By admin | Published: July 03, 2015 11:52 PM