विकास शहा-शिराळा उत्तर व पूर्व भागासाठी वरदायी ठरलेल्या शिराळा शहराजवळच्या मोरणा मध्यम प्रकल्पात ऐन पावसाळ्यात ५0 टक्क्यापेक्षा कमी पाणीसाठा राहिला. त्यातच मोरणा नदीपात्र कोरडे पडल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मोरणा मध्यम प्रकल्प पाऊण टीएमसी क्षमतेचा आहे. मृतसाठा सोडून ५२६ एमसीएफटी उपयुक्त पाणीसाठा होतो. धरण लाभक्षेत्राखाली साडेचार हजार क्षेत्र ओलिताखाली येते; मात्र सध्या दुप्पट क्षेत्र ओलिताखाली आहे. वाकुर्डेपासून मांगलेपर्यंत मांगले गाव वगळता जवळपास सर्व गावांना पिण्याचा पाणी पुरवठा या धरणातूनच होतो. शिराळा येथील औद्योगिक वसाहतीमधील छोट्या-मोठ्या ५० उद्योगधंद्यांसाठी लागणारे पाणीही या धरणातूनच घेतले जाते. या धरणामधून सात हजार अश्वशक्ती मोटारीने पाणी उपसा सुरू असतो. शिराळा तालुक्यातील उत्तर व पूर्व भाग बहुतांशी पाण्यापासून वंचित आहे. वंचित असणाऱ्या भागातील काहीअंशी जमिनी मोरणा धरणावर अवलंबून आहेत. या धरणाच्या पाण्यावर अनेक गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटतो. मात्र पावसाळ्यात तब्बल तीन महिने पावसाने पाठ फिरवली. जिल्ह्यात शिराळा तालुका वगळता सर्वत्र परतीच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे येथील खरीप हंगाम वाया गेला आहे. याचा परिणाम धरणातील पाणीसाठ्यावरही झाला आहे. धरण झाल्यापासून पहिल्यांदाच एवढा कमी पाणीसाठा झाला आहे. उन्हाळा सुरू व्हायला काही महिने बाकी असतानाच पाणीटंचाई भासू लागली आहे. दुष्काळसदृश परिस्थिती जाणवत असतानाही पाटबंधारे विभागाने गांधारीची भूमिका का घेतली आहे? अजूनही पाण्याचे नियोजन का केलेले नाही?, असा सवाल उपस्थित होत आहे. पाटबंधारे खात्याच्या नियोजनाअभावी शेतकऱ्यांनी रब्बी पिकांचे नियोजन केलेले नाही. धरणाखालील पिकांची अवस्था बिकट आहे. मोरणाकाठच्या शेतकऱ्यांनी लाभक्षेत्रापेक्षा दुप्पट क्षेत्र ओलिताखाली आणले आहे. मोरणा नदीपात्र कोरडे पडल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.प्रशासनाने पाण्याचे नियोजन करावेशिराळा शहरासह औद्योगिक वसाहतीसाठी मोरणा धरणातून पाणी पुरवठा होत आहे. धरणातील पाणी साठ्यामध्ये घट होत चालली आहे. अशीच परिस्थिती राहिली, तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. शिराळा ग्रामपंचायतीने माजी आ. मानसिंगराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली विचारविनिमय करून यासंदर्भात ठरावही दिला आहे, अशी प्रतिक्रिया शिराळ्याचे सरपंच गजानन सोनटक्के यांनी दिली.पन्नास टक्केपेक्षा कमी पाऊस : रब्बी हंगाम अडचणीत शिराळा तालुक्यात ५० टक्केपेक्षा कमी पाऊस पडला आहे. तालुका पूर्ण दुष्काळी परिस्थितीत आहे. मोरणा धरणात ४0 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. पाण्याचा वापर नियोजनाने केला नाही, तर मोरणा परिसरामध्ये अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण होईल. याचा विचार करून लाभक्षेत्रातील शेतकरी व पाटबंधारे विभागाने एकत्रित बसून समन्वयाने नियोजन केले, तर शेतकऱ्यांना न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया मोरणा फळे-फुले भाजीपाला संघ अध्यक्ष सुखदेव पाटील यांनी दिली.
एफडीआयद्वारे बिहारात रेल्वे इंजिनांचे कारखाने
By admin | Published: November 09, 2015 10:05 PM