सांगली : कर्नाटकात महाराष्ट्रापेक्षा इंधन स्वस्त असल्याने महाराष्ट्रातील सीमेवरील अनेक पंपांना टाळे लागले आहे. पंप बंद करता येत नाही, म्हणून जेमतेम सुरू ठेवण्यात आले आहेत.राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी केला, तरी त्यामुळे इंधन अवघ्या एक रुपयांनी स्वस्त होईल. त्यामुळे ग्राहकांना फारसा फरक पडणार नाही. कर्नाटक सीमेवरील पंपांनाही फारसा दिलासा मिळणार नाही. सीमावर्ती भागातील वाहने आणि शेतकरी कर्नाटकात जाऊन इंधन भरत असल्याने महाराष्ट्र हद्दीतील पंप ओस पडले आहेत.विशेषत: मिरज व जत तालुक्यांतील पंपांना टाळे ठोकण्याची वेळ आली आहे. पंप बंद करता येत नाही म्हणून एखाद्या कामगारावरच सुरू ठेवल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. तरीही दररोजचा खर्च भागत नसल्याने नुकसान सोसावे लागत आहे. कर्नाटकात कामानिमित्त गेलेली वाहने, पर्यटकांच्या गाड्या तेथूनच टाकी फुल्ल करून येत आहेत.विक्रीअभावी पंपचालकांनी कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. चोवीस तास चालणारे पंप आता फक्त दिवसा सुरू आहेत.
कर्नाटकातील इंधन स्वस्ताईमुळे सीमा भागातील पंप बंद पडले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 4:52 PM