सांगली : पेट्रोल, डिझेल दरवाढप्रश्नी केंद्र आणि राज्य शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत कॉंग्रेसने बुधवारी सांगलीत सायकल रॅली काढली. ‘इंधनावरील अन्यायकारक कर रद्द करा’, ‘गॅस सिलिंडरची दरवाढ रद्द करा’ अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. कॉंग्रेस भवनापासून सायकल रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीत कॉंग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. आझाद चौक, स्टेशन चौक, कापडपेठ, हरभट रोड, गणपती पेठ, पटेल चौक, आमराई, कॉलेज कॉर्नर, आपटा पोलिस चौकी, राम मंदिर चौकमार्गे रॅली कॉंग्रेस भवनापर्यंत आली. याठिकाणी रॅलीची सांगता करण्यात आली. इंधन दरवाढ रद्द करण्यासह शासनाच्या निषेधाचे फलक सायकलला लावण्यात आले होते. कॉंग्रेस भवनासमोर रॅलीचा समारोप होताना पृथ्वीराज पाटील म्हणाले की, ‘अच्छे दिन’चा नारा देत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने सामान्य लोकांचे जगणे मुश्किल केले आहे. आधीच महागाईच्या खाईत गेलेल्या नागरिकांवर आणखी महागाईचा बोजा टाकण्याचे काम सरकार करीत आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीमुळे सर्व घटकांवर परिणाम होत आहेत. वाहतूक खर्च वाढून जीवनावश्यक वस्तुंचे दरही वाढत आहेत. देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात क्रूड आॅईल (कच्चे तेल)चा भाव ११0 रुपये प्रति बॅरेल होता. त्यावेळी पेट्रोल ६0 ते ६५ रुपये लिटरने मिळत होते. नरेंद्र मोदींच्या काळात डिसेंबर महिन्यात कच्च्या तेलाची किंमत बॅरेलमागे २५.२८ रुपयांनी कमी होऊनही पेट्रोल ८0 रुपये लिटरपर्यंत वाढले आहे. त्यामुळे हा नेमका गोलमाल काय आहे, असा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे. मोदी सरकारच्या काळात पेट्रोलचा भाव शंभर रुपयांपर्यंत जाईल, असा अंदाज आता वर्तविला जात आहे. महाराष्ट्र शासन पेट्रोलवर ९ रुपये अधिभार आणि २५ टक्के व्हॅट आकारत आहे. त्यामुळे जनतेची ही मोठी लूट आहे. आम्ही त्यांचा निषेध करीत आहोत, असे पाटील म्हणाले. आंदोलनात नगरसेवक राजेश नाईक, डॉ. राजेंद्र मेथे, रवी खराडे, बिपीन कदम, मंगेश चव्हाण, कय्युम पटवेगार, अमित पारेकर, सनी धोत्रे, संतोष पाटील, आशिष चौधरी, अशोक मासाळ, मुफित कोळेकर, धनराज सातपुते, रफिक मुजावर, सचिन चव्हाण, शहाजी जाधव, मौलाअली वंटमुरे, पैगंबर शेख, संग्राम चव्हाण, दत्तात्रय मुळीक आदी सहभागी होते.
इंधन दरवाढीचा निषेध, सांगलीत काँग्रेसची सायकल रॅली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 2:22 PM