सांगली : जबरी चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यात गेल्या पाच वर्षांपासून फरारी असलेल्या संशयितास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने खेड (जि. रत्नागिरी) येथून अटक केली. विकी ऊर्फ विकास संतराम गोसावी (वय २९, रा. वाल्मिकी आवास, सांगली) असे त्याचे नाव असून, त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेत त्यांच्यावर कडक कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे पथक गुन्ह्यांची माहिती घेत असताना, सहा जबरी चोऱ्या, घरफोडीच्या गुन्ह्यात हवा असलेला संशयित विकी गोसावी हा भरणा खेड रत्नागिरी येथे असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने खेड पोलिसांच्या मदतीने सापळा लावून त्यास ताब्यात घेतले. यावेळी त्याने साथीदाराच्या मदतीने गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्यावर सांगली शहर, सांगली ग्रामीण, संजयनगर, विश्रामबाग, मिरज शहर, ग्रामीण, कुपवाड एमआयडीसी याच्यासह इतर जिल्ह्यातही गुन्हे दाखल आहेत. चौकशीत त्याच्याकडून अजून काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
एलसीबीचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक रविराज फडणीस, उपनिरीक्षक अभिजित सावंत, नीलेश कदम, संतोष गळवे, संदीप नलवडे, मेघराज रूपनर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
------------------------
२६ विकी गोसावी नावाने एडीटोरियलवर