सत्ता राखणाऱ्या महाराष्ट्रातील १७ खासदारांसाठी तरी निधी द्या; विशाल पाटील लोकसभेत बरसले!
By अशोक डोंबाळे | Published: July 29, 2024 10:14 PM2024-07-29T22:14:45+5:302024-07-29T22:16:21+5:30
महाराष्ट्र गीताच्या ओळी गात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी खासदारांवर टोलेबाजी.
अशोक डोंबाळे/सांगली, लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : संसदेच्या अधिवशेनात सोमवारी खासदार विशाल पाटील यांनी महाराष्ट्र गीताच्या ओळी गात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी खासदारांवर टोलेबाजी केली. ते म्हणाले, ‘दारिद्र्यांच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा.’ इतिहास साक्षी आहे, दिल्लीचे तख्त राखण्याची जबाबदारी महाराष्ट्र घेत होता, घेत आहे आणि घेत राहील. केंद्रातील सरकार सलामत राखण्याचे काम तुमच्या १७ खासदारांनी केले आहे. त्यांसाठी तरी केंद्राने निधी देण्याची गरज होती, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
विशाल पाटील पुढे म्हणाले, आम्ही विरोधी पक्षाचे खासदार आहोत. तुम्ही आमच्याकडे पाहू नका, पण तुमचे केंद्रातील सरकार सत्तेवर आणणाऱ्या महाराष्ट्रातील 'त्या' १७ खासदारांकडे पाहून तरी निधी द्या. मला त्यांचे हसरे चेहरे पाहून काही ओळी सुचतात, ‘आज तुम जो इतना मुस्कुरा रहे हो, क्या दर्द है जो छुपा रहे हो.’ त्यांना चिंता आहे, त्यांच्या मतदार संघात जाऊन ते सांगणार काय? अर्थसंकल्पातून काय मिळाले?’’ ते म्हणाले, ‘‘कुबड्या घेऊन चालणारे हे सरकार आहे. ते देश बुडवू नये, एवढी अपेक्षा आहे. शेतकरी कर्जमाफी, महागाई नियंत्रण, ईपीएस पेन्शन, भूमिहीन शेतकरी सन्मान योजना, खते व बियाण्यांवर जीएसटी नको या सगळ्या मागण्या तुम्ही अमान्य केल्या. फूड सबसिडीवरील निधी कमी केला. खतांचे अनुदान कमी केले. घरांसाठी फक्त ५ टक्के जादा तरतूद केली. नव्या योजनांचा फक्त उल्लेख करता, त्या काय आहेत, ६० हजार कोटी कुठे जाणार, हे स्पष्ट का सांगत नाहीत. ‘बोलाचीच कढी, बोलाचाच भात, जेवूनिया तृप्त कोण झाला’, अशी अवस्था आहे. ज्या राज्याचा जीडीपी घसरला तिथे भाजप हरला आहे. असेच अर्थ धोरण राहिले तर भाजपचे पतन निश्चित आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते हरयाणा आणि महाराष्ट्रात पराभूत होणार आहे, हे नक्की आहे.