ऐतवडे बुद्रुक (सांगली) : ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) गावचे सुपुत्र, थोर शिक्षणमहर्षी व रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे गावामध्ये राष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाने गावाच्या विकासासाठी भरीव निधी द्यावा, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी राज्याच्या प्रधान सचिवांकडे केली आहे, अशी माहिती उपसरपंच सौरभ पाटील यांनी दिली.
कर्मवीर भाऊराव पाटील यांची ऐतवडे बुद्रुक ही मातृभूमी आहे. कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक खेडोपाड्यात शिक्षणाची ज्ञानगंगा पसरविली. कर्मवीर भाऊराव पाटील यांची अनेक ठिकाणी स्मारके आहेत. तसेच रयत शिक्षण संस्था व विविध माध्यमातून अनेक गावांचा विकासही साधला आहे.मात्र कर्मवीरांची मातृभूमी असणारे ऐतवडे बुद्रुक हे गाव मात्र कर्मवीरांचे स्मारक व विकासात्मक दृष्टीने मागासच राहिले आहे. त्यामुळे या दुर्लक्षित गावात कर्मवीरांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भरघोस निधी मिळावा, अशी मागणी नागपूर अधिवेशनात माजी मंत्री, आमदार सतेज पाटील यांनी राज्याच्या प्रधान सचिवांकडे केली आहे.
सध्या येथील बाजारपेठेत कर्मवीर भाऊराव पाटील यांचा अर्धपुतळा आहे. तत्कालीन सरपंच बाबासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून लोकवर्गणीतून तो उभारला होता. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील यांच्या प्रयत्नातून पालकमंत्री पतंगराव कदम यांनी दिलेल्या निधीतून पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात आले. परंतु कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्यास साजेसे असे स्मारक व्हावे, त्यामध्ये अण्णांचा पूर्णाकृती पुतळा, सुसज्ज ग्रंथालय, अभ्यासिका, प्रशस्त सभागृह, शिल्पसृष्टी व इतर सोयी व्हाव्यात, अशी मागणी होत आहे.अण्णांचे गाव म्हणून ऐतवडे बुद्रुकची राज्यभर ओळख व गावची सुधारणा व्हावी यासाठी शासनाने भरीव निधी द्यावा, अशी मागणी ग्रामस्थ व उपसरपंच सौरभ पाटील यांनी केली आहे.
स्मारक रखडलेऐतवडे बुद्रुक येथे कर्मवीरांच्या वारसांच्या नावाने सुमारे दोन गुंठे जागा आहे. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून येथे स्मारक होण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. परंतु प्रशस्त जागेअभावी तो प्रस्ताव मागे राहिला आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील यांचे स्मारक व्हावे व गावच्या विकासासाठी भरीव निधी मिळावा यासाठी आजपर्यंत राज्यातील४० आमदारांना पत्रे पाठवली आहेत. तसेच सर्व आमदार व मंत्री यांना पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. तसेच गावातील सर्वपक्षीय नेत्यांना घेऊन संबंधित मंत्री व मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे.- सौरभ पाटील,उपसरपंच, ऐतवडे बुद्रुक.