कडेगाव : कडेगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम व आमदार मोहनराव कदम यांच्या प्रयत्नातून २ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नगरविकास विभागाच्या विशेष अनुदान योजनेतून वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी हा निधी मंजूर केला आहे. या निधीतून नगरपंचायतीमार्फत शहरातील विकास कामांना लवकरच प्रारंभ होणार आहे, अशी माहिती सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष व काँग्रेसचे नेते शांताराम कदम यांनी दिली.
कडेगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते सुरेशचंद्र थोरात, सोनहिराचे संचालक दीपक भोसले, माजी सरपंच विजय शिंदे, नगराध्यक्षा संगीता राऊत, उपनगराध्यक्ष दिनकर जाधव उपस्थित होते.
यावेळी शांताराम कदम यांनी, मंजूर निधीतून होणाऱ्या कामांचीही माहिती दिली. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक ते निमसोड रोड स्मशानभूमीपर्यंत रस्ता व गटर यासाठी ८५ लाख, शहरातील नागपूर वसाहतमधील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरणासाठी २५ लाख, नागपूर वसाहतकडे जाणाऱ्या रस्त्यावर साकव पुलासाठी २५ लाख, ग्रामीण रुग्णालय ते शिंदेनगरकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी १५ लाख, स्वामी समर्थ मठ ते अशोकराव मोरे यांच्या घरापर्यंत गटर व रस्ता करण्यासाठी १५ लाख रुपयांचा निधी मिळणार आहे.
याशिवाय डॉ. रेणुशे हॉस्पिटल ते युवराज राजपूत घरमार्गे वडतुकाई मंदिरापर्यंत गटर व रस्ता करण्यासाठी २० लाख, चंद्रकांत मोहिते घर ते विलास घरापर्यंत गटर व रस्ता करण्यासाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. उर्वरित कामांसाठी लवकरच निधी मंजूर होईल, असा विश्वास शांताराम कदम यांनी व्यक्त केला.
यावेळी कडेगावच्या माजी नगराध्यक्षा आकांक्षा जाधव, नीता देसाई, माजी उपनगराध्यक्ष साजिद पाटील, राजू जाधव, नगरसेवक सागर सूर्यवंशी, सुनील पवार, संगीता जाधव, रिजवाना मुल्ला, श्रीरंग माळी उपस्थित होते.