धनगाव (ता. पलूस) शाळेत निधी संकलनप्रसंगी सरपंच सतपाल साळुंखे, उदय साळुंखे, वसंतराव पवार, संदीप यादव, संजय डोंगरे, अभिजित शेळके, श्रावणी साळुंखे आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भिलवडी : धनगाव (ता. पलूस) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची राज्य शासनाने मॉडेल स्कूल - "माझी शाळा आदर्श शाळा" या योजनेसाठी पलूस तालुक्यातून निवड केली आहे. या शाळेला सर्व सोयी-सुविधांनीयुक्त व राज्यभरातील आदर्शवत शाळा बनविण्याचा संकल्प नागरिकांनी केला आहे. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी तासाभरात एक लाख तेहतीस हजार रुपये निधी जमा केला. धनगावचे सरपंच सतपाल साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली शाळा सुशोभिकरण व रंगकामाचा शुभारंभ करण्यात आला.
गावाचे सुपुत्र व भारती विद्यापीठाचे कुलगुरू माणिकराव साळुंखे : (२५ हजार), अभिजित शेळके (२७ हजार), उदय साळुंखे (२५ हजार), डॉ. विष्णू साळुंखे (१५ हजार), सुधाकर रोकडे (११हजार), रवींद्र साळुंखे (१० हजार), चंद्रकांत पाटील (५ हजार), माणिक साळुंखे (५ हजार), नीलेश साळुंखे (५ हजार), ऋतुजा मोहिते (५ हजार) रुपये, अशी देणगी दिली. एका तासात तब्बल एक लाख ३३ हजार रुपये निधी संकलित झाला आहे.
मुख्याध्यापक संजय डोंगरे यांनी शाळेमधील सर्व सोयी-सुविधांविषयी माहिती सांगून माजी विद्यार्थी व नागरिकांनी मॉडेल स्कूलसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी उपसरपंच कुसुम साळुंखे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रावणी साळुंखे, माजी सरपंच वसंतराव पवार, संदीप यादव, दिलीप मोहिते, विजय धेंडे, अजित जाधव, मनीषा चव्हाण, सीमा चौगुले, रेश्मा राजगुरू आदींसह शिक्षक, पालक, आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते.