शीतल पाटील- सांगली -विकासकामांचे मार्केटिंग करण्याची परंपरा असलेल्या राष्ट्रवादीने आता विरोधी बाकावरून ही परंपरा जोपासताना त्याला राजकारणाचा वेगळाच रंग दिला आहे. माजी मंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते विकास कामांची उद्घाटने करताना त्यांनी नेहमीप्रमाणे गाजावाजा केला नाही. तरीही या कार्यक्रमांमधून जयंतरावांनी काँग्रेस नेत्यांवर घेतलेले तोंडसुख आता महापालिकेत कळीचा मुद्दा बनला आहे. वास्तविक काँग्रेस नेत्यांनी प्रयत्न करून आणलेल्या निधीवर राष्ट्रवादीने नारळ फोडताना त्यांच्यावरच टीकास्त्र सोडल्याने, राजकारणाचे हे अजब रसायन काँग्रेसवाल्यांना पचनी पडताना जड जात आहे. दोन दिवसांपूर्वी महापालिकेचे विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, नगरसेवक विष्णू माने, स्नेहा औंधकर, शेडजी मोहिते यांच्या प्रभागातील विकास कामांचे उद्घाटन जयंत पाटील यांच्याहस्ते झाले. या कार्यक्रमात जयंतरावांनी नेहमीच्या शैलीत पालिकेतील कारभारी काँग्रेसचा पंचनामा केला. जयंतरावांच्या टीकेनंतर पालिकेतील सत्ताधारी काँग्रेस व अधिकाऱ्यांना विकास कामांची उद्घाटने झाल्याचे समजले. यापूर्वी असा प्रकार राष्ट्रवादीकडून कधीच झाला नव्हता. अगदी दोन-चार लाखाचे काम असले तरी, राष्ट्रवादीचे नगरसेवक त्याचा मोठा गाजावाजा करत. कार्यक्रमाच्या तयारीपासून ते संपेपर्यंत नगरसेवकांची धावपळ असे. पण यावेळी या साऱ्या गोष्टीला फाटा दिला होता. कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिका छापली होती; पण ती केवळ राष्ट्रवादीच्या नगरसेवक व प्रभागातील नागरिकांपुरतीच मर्यादित होती. उद्घाटनाचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर मात्र सत्ताधारी काँग्रेस व प्रशासनाच्या भुवया उंचावल्या. त्याला कारण होते, जयंतरावांची टीका. जयंतरावांनी स्थापन केलेली महाआघाडी सत्तेतून गेल्यापासून पालिकेची आर्थिक स्थिती ढासळली आहे. तरीही राष्ट्रवादीचे नगरसेवक नागरिकांना दिलेली आश्वासने पूर्ण करीत आहेत, असे वक्तव्य करून जयंतरावांनी काँग्रेसला चिमटा काढला, पण आता हा प्रकार राष्ट्रवादीच्या अंगलट येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर मदन पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडून खास बाब म्हणून निधी आणला होता. या निधीतून कोणती कामे करायची, याचे पत्रही खुद्द मदन पाटील यांनीच दिले होते, तर पालकमंत्रीपदी असताना पतंगराव कदम यांनी जिल्हा नियोजन समितीतून पालिकेला पाच कोटींचा निधी दिला होता. या निधीतून सर्वच नगरसेवकांच्या प्रभागातील कामांना प्रााधान्य देण्यात आले. वीस कोटींच्या निधीतील कामांना दिग्विजय सूर्यवंशी यांनीच विरोध करत जिल्हा न्यायालयात आव्हान दिले होते. तरीही ही कामे आता मार्गी लागल्याने भविष्यात काँग्रेसचे कार्यकर्ते या कामाचे श्रेय घेऊ शकतात, त्यासाठीच उदघाटनाचे सोपस्कार राष्ट्रवादीने घाईगडबडीत उरकल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक करू लागले आहेत. माझ्या प्रभागातील काही कामे जिल्हा नियोजन समिती, बायनेम व शासकीय निधीतील आहेत, तर काही कामे जयंत पाटील यांनी आणलेल्या निधीतील आहेत. आम्ही गुपचूप उद्घाटने केली नाहीत. प्रभागात रिक्षा फिरवून ध्वनिक्षेपकावरून माहिती दिली होती. निमंत्रणपत्रिकाही छापल्या होत्या. महापौर, उपमहापौरांचा राजीनामा घेण्यात येणार असल्याने आणि आयुक्त बाहेरगावी असल्याने त्यांची नावे निमंत्रण पत्रिकेत छापली नाहीत. काँग्रेसनेही अनेक कार्यक्रमात ‘प्रोटोकॉल’ पाळलेला नाही. - दिग्विजय सूर्यवंशी, विरोधी पक्षनेते, महापालिका.‘प्रोटोकॉल’ची ऐशीतैशीदिग्विजय सूर्यवंशी व विष्णू माने यांच्या प्रभागातील कामांसाठी पतंगराव कदम, मदन पाटील यांच्या प्रयत्नातून निधी मिळाला असला, तरी किमान उद्घाटनांचे कार्यक्रम घेताना ‘प्रोटोकॉल’ पाळण्याची आवश्यकता होती. महापालिका व शासकीय निधीतून झालेल्या या कामांच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर केवळ राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावे होती. महापौर, उपमहापौर, गटनेता, आयुक्त, स्थायी समिती सभापती यांचे नाव निमंत्रण पत्रिकेवर अपेक्षित होते, पण राष्ट्रवादीने ‘प्रोटोकॉल’च धुडकावल्याची चर्चा आहे. सत्ताधारी काँग्रेसच ‘प्रोटोकॉल’ पाळत नसेल, तर आम्ही कशासाठी पाळायचा?, असा सवाल दिग्विजय सूर्यवंशी यांनी केला.
निधी काँग्रेसचा, उद्घाटने जयंतरावांची!
By admin | Published: January 20, 2015 10:57 PM