मिरज : तालुक्यातील म्हैसाळ येथे खासगी रूग्णालयात गर्भपात करताना अतिरक्तस्त्रावामुळे स्वाती प्रवीण जमदाडे (वय २५) या विवाहितेच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी तिचे वडील सुनील जाधव यांनी ग्रामीण पोलिसात विवाहितेचा पती, सासू, सासऱ्याविरुध्द, आपल्या मुलीचा अनैसर्गिक गर्भपात करून तिचा खून केल्याची तक्रार दिली आहे. स्वाती हिच्या मृत्यूमुळे संतप्त नातेवाईक व खंडेराजुरी येथील ग्रामस्थांनी पती व सासऱ्याला चोप देत मणेराजुरी येथे पतीच्या घरासमोरच तच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. खंडेराजुरी येथील स्वाती जाधव हिचा सहा वर्षापूर्वी मणेराजुरी येथील प्रवीण जमदाडे याच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर त्यांना दोन मुली झाल्या. तिसऱ्यांदा गर्भवती असलेल्या स्वातीची पती प्रवीण जमदाडे याने म्हैसाळ येथील एका खासगी डॉक्टरकडे गर्भलिंग चाचणी केली. त्यावेळी तिसरीही मुलगीच असल्याचे निदान झाल्याने, संबंधित डॉक्टरने तेथेच स्वातीचा गर्भपात करण्याची तयारी दर्शविली. तिचा गर्भपात केल्यानंतर अतिरक्तस्त्रावामुळे स्वातीची प्रकृती अत्यवस्थ झाल्यानंतर तिला भारती रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. स्वातीच्या मृत्यूनंतर पतीने शवविच्छेदन न करताच मृतदेह अंत्यसंस्कारासाठी मणेराजुरी येथे नेला. स्वातीच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करीत तिच्या संतप्त नातेवाईकांनी अंत्यसंस्कार करण्यास विरोध केल्याने, पतीने स्वातीचा मृतदेह सांगलीच्या शासकीय रूग्णालयात आणला. स्वातीचे वडील सुनील बाळासाहेब जाधव व आई व्यवसायानिमित्त पाँडेचरी येथे असल्याने आई-वडील सांगलीत येईपर्यंत नातेवाईकांनी स्वातीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास सासरच्या मंडळींना रोखले. स्वातीचे आई-वडील गुरूवारी रात्री आल्यानंतर शासकीय रूग्णालयाच्या आवारात नातेवाईक व खंडेराजुरीतील ग्रामस्थांनी स्वातीचा पती व सासऱ्याला चोप दिला. त्यानंतर रात्री ११ वाजता स्वातीचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी मणेराजुरी येथे आणण्यात आला. यावेळी वातावरण प्रचंड तणावपूर्ण झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून तासगावचे पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी सहायक निरीक्षक धनाजी पिसाळ यांना बंदोबस्तासाठी पाठवले. जिल्'ातून अन्य ठिकाणाहून बंदोबस्त मागवला. स्वातीच्या नातेवाईकानी दारातच अंत्यसंस्कार करायचे, असे म्हणत तयारी केली. मात्र पिसाळ यांनी जमावाला शांत केले. यानंतर रात्री २ वाजता घरासमोरील बाजूच्या शेतात स्वातीच्या पाच वर्षाच्या मुलीच्या हातून अंत्यसंस्कार करण्यात आले. स्वातीचे वडील सुनील जाधव यांनी मिरज ग्रामीण पोलिसात प्रवीण जमदाडे, सासू शांताबाई, सासरा पतंगराव, नणंद रेखा, दीर सुभाष जमदाडे व म्हैसाळ येथील खासगी डॉक्टरने अनैसर्गिक गर्भपात करून मुलीचा खून केल्याची तक्रार दिली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
मणेराजुरीत पतीच्या घरासमोरच मृत विवाहितेवर अंत्यसंस्कार
By admin | Published: March 03, 2017 11:38 PM