रेठरे धरण येथे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बचाक्कानगर परिसरातून सुरू झालेला संसर्ग गावातील बहुतांश भागात पाेहाेचला आहे. आतापर्यंत बचाक्कानगर येथील तीन व्यक्तींचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे.
गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात साथ पसरत असताना अजूनही ग्रामसेवकांचे दर्शन झालेले नाही. गावातील महिला तलाठी प्रकृती अस्वास्थ्यामुळे रजेवर असल्याचे सांगण्यात येत आहे. गावातील ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, तसेच आपत्ती व्यवस्थापन कमिटी गायब आहे. गावात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना ग्रामपंचायतीने गावात कोरोना रोखण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त हाेत आहे.
रेठरे धरण येथील जाेतिबा मंदिरात लसीकरणासाठी नाव नोंदणी करत असताना ग्रामस्थांनी सामाजिक अंतर न ठेवता गर्दी केली होती. राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक आनंदराव पाटील गावात फिरून व्यापारी व नागरिकांना मास्क वापराविषयी प्रबोधन करत आहेत. त्यानी हाेम आयसाेलेशनमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांच्या भेटी घेऊन प्रकृतीबाबत विचारपूस केली. हाेम आयसाेलेशनच्या नियमांचे पालन करण्याबाबत तसेच घराबाहेर न पडण्याबाबत सूचना केल्या.