सांगली : येथील डॉक्टरांनी गडचिरोलीतील आदिवासींसाठी आरोग्य शिबीर आयोजित करुन विविध आजारांवरील शस्त्रक्रिया केल्या. गेल्या १४ वर्षापासून डॉक्टरांकडून हा उपक्रम राबविला जात आहे.
डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांच्या आदिवासींसाठी असलेल्या शोधग्राम (सर्च) या रुग्णालयात शिबीर घेऊन शस्त्रक्रिया केल्या. हर्निया, हायड्रोसील, गर्भाशयाची पिशवी काढणे, किडणी स्टोण, लहान मुलांचे हर्निया, दुभंगलेले ओठ-टाळा, भाजलेले रुग्ण यासह अनेक आजारांनी त्रस्त असलेल्या आदिवासी रुग्णांवर शस्त्रक्रिया व औषधोपचार केले. तत्पूर्वी आठवड्याभर अगोदर रुग्णांना बोलावून त्यांच्या प्राथमिक तपासण्या करण्यात आल्या.
तीन सुसज्ज शस्त्रक्रिया विभाग आहेत. शस्त्रक्रियेस लागणारी साधनसामुग्री, भुलीचे यंत्र, मॉनिटर्स व औषधे मुबलक असल्याने डॉक्टरांना हे काम सहजपणे करता येत आहे. कोल्हापूरातील डॉक्टरही या उपक्रमात सहभागी होतात.
डॉ. रवींद्र व्होरा व डॉ. एम. पी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मोहन पाटील, डॉ. अनिल गायकवाड, डॉ. अमोल कुलकर्णी, डॉ. हेमंत लिमये, कोल्हापूरचे डॉ. किरण भिंगारडे, डॉ. नितीन सुखदेव, लोणंद (जि. सातारा) येथील डॉ. संजय शिवडे आदी डॉक्टर यामध्ये सहभागी होऊन आदिवासींसाठी काम करीत आहेत. आतापर्यंत अडीच ते तीन हजार शस्त्रक्रिया केल्या आहेत.