सांगली : आयर्विन पुलास समांतर पूल करण्यावरून सुरू असलेली राजकीय स्टंटबाजी केवळ गाडगीळांना या कामाचे श्रेय मिळू नये म्हणून सुरू आहे, असे मत भाजपचे प्रवक्ते मुन्ना कुरणे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
ते म्हणाले की, कापडपेठेतील व्यापाऱ्यांचे या पुलामुळे कोणतेही नुकसान होणार नाही. याऊलट आयर्विन पूल बंद झाल्याने पेठेतील व्यापार कमी झाला आहे. त्यांना पेठेतून रस्ता जाण्याबाबत शंका वाटत असेल, तर त्याबाबत प्रशासनाकडून त्यांनी हमी घ्यावी, पण शहरातील महत्त्वाकांक्षी योजनेला विरोध करू नये. अनेक व्यापारी पूल व्हावा या मताचे आहेत. केवळ राजकीय दबावामुळे त्यांची अडचण होत आहे.
आमदार सुधीर गाडगीळ हे नवखे आमदार असूनही एकाच टर्मला त्यांनी तीन पूल मंजूर केले. वारणालीतील उड्डाणपूल पूर्ण झाला असून, हरिपूर-कोथळी पूल पूर्णत्वास येत आहे. केवळ आयर्विन पुलाच्या समांतर पुलाचा प्रश्न राजकारणामुळे रेंगाळला आहे. गाडगीळ यांना कोणत्याही परिस्थितीत याचे श्रेय मिळू नये म्हणून हा सर्व विरोध सुरू झालेला आहे. कापडपेठ, हरभट रोडवरील दुकानदार, व्यापाऱ्यांना हा पूल हवा आहे. नव्या पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत आयर्विन पूल खुला करावा, अशीही मागणी होत आहे.
चौकट
चिंचबागेलाही धोका नाही
सांगलीवाडीतील चिंचबागेला धोका असल्याचे सांगून काहींनी विरोध केला होता. आता त्या बागेलाही काही अडचण येणार नाही. त्यामुळे कोणीही विनाकारण विरोध करू नये. शहराच्या विकासात महत्त्वाची भर टाकणारा नवा पूल होण्यास सर्वांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन कुरणे यांनी केले आहे.