सांगली : अनिकेत कोथळेचा खून करून त्याचा मृतदेह जाळणाºया पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी दलित महासंघाच्यावतीने सांगली शहर पोलिस ठाण्यावर गाढव मोर्चा काढण्यात आला. यावेळी कामटे याच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून निदर्शने करण्यात आली.
महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते, उपाध्यक्ष दिलीप शेलार, शहराध्यक्ष वनीता ठोकळे यांच्या नेतृत्वाखाली वाल्मिकी आवास येथून मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा शहर पोलिस ठाण्यावर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. कामटे याच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहनही करण्यात आले. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिस ठाण्यात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक राजेंद्र शेळके यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, उपनिरीक्षक कामटे याने अनेक तरुणांना खोट्या गुन्ह्यात अडकविले आहे. या तरुणांना पोलिस ठाण्यात आणून अमानुष मारहाण केली आहे. याबाबत महासंघाच्यावतीने वरिष्ठ अधिकाºयांना वेळोवेळी निवेदन देण्यात आले होते. पण वरिष्ठांनी याकडे वेळीच लक्ष न दिल्याने अनिकेत कोथळे या तरूणाचा बळी गेला. कोथळे याच्या कुटुंबीयांना ५० लाखाची मदत द्यावी, त्याच्या पत्नीला शासकीय सेवेत समावून घ्यावे, अशी मागणी केली.