शिरटे : यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखान्याच्या ५८ व्या वार्षिक सभेत सत्ताधारी व विरोधी गटाच्या समर्थकांमध्ये आज, सोमवारी गदारोळ झाला. विरोधी गटाचे डॉ. इंद्रजित मोहिते व्यासपीठाकडे येत असताना व्यासपीठावर चपला फेकण्याचा प्रकारही झाला. त्यानंतर सत्ताधारी गटाच्या संतापलेल्या कार्यकर्त्यांनी डॉ. मोहिते यांच्यासह आदित्य मोहिते यांना मारहाण केली. या गोंधळात मोहिते यांचा चष्मा फुटला. दहा मिनिटे चाललेला हा गोंधळ व संतापलेला जमाव काबूत ठेवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. या गदारोळातच सभेचे कामकाज संपल्याचे अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी जाहीर केले.कृष्णा कारखान्याच्या कार्यस्थळावर सकाळपासूनच सभास्थळी गर्दी होती. दुपारी बारापर्यंत सभामंडप खचाखच भरला होता. कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, मदनराव मोहिते व त्यांचे समर्थक दुपारी दीडच्या सुमारास सभास्थळी दाखल झाले. त्यांना मंडपाजवळच सुरक्षा रक्षकांनी रोखले. यातूनही डॉ. इंद्रजित मोहिते, आदित्य मोहिते, मानसिंग ऊर्फ बाळनाना पाटील, गुलाबराव पाटील, दिलीपराव मोरे, प्रसाद पाटील यांच्यासह काही समर्थकांनी व्यासपीठाकडे धाव घेतली. त्यावेळी सत्ताधारी गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ही सभा बेकायदेशीर असून ती थांबवावी, असे डॉ. मोहिते सांगत असताच, पाठीमागून चपला फेकण्यात आल्या. व्यासपीठासमोरच असणारे सत्ताधारी गटाचे कार्यकर्ते डॉ. मोहिते यांच्या अंगावर गेल्याने जोरदार हाणामारी झाली. यामध्ये त्यांचा चष्मा फुटला, तर आदित्य मोहिते यांचा शर्ट फाटला. त्यांना जबर मारहाणही केली.सुमारे दहा मिनिटे चाललेल्या या गोंधळातच कारखान्याचे सचिव उदय मोरे यांनी विषय वाचन केले. तसेच उपस्थित सत्ताधारी गटाच्या सभासदांनी सर्व ठराव मंजूर, अशा घोषणा दिल्या. यावेळी अध्यक्ष अविनाश मोहिते म्हणाले की, कारखान्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. सभासदांनी विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये. संस्थापक पॅनेलने जे वचन सभासदांना दिले होते, ते तंतोतंत पाळण्याचे काम होत आहे. विरोधकांनी गोंधळ न घालता निवडणुकीत उतरण्याचे धाडस दाखवावे. यापुढे अशा गोंधळबाजांचा चोख बंदोबस्त करू.उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी स्वागत केले. संचालक ब्रह्मानंद पाटील यांनी आभार मानल्यानंतर सभेचे कामकाज संपले. यावेळी उमेश पवार, भरत कदम, विश्वास देसाई, सतीश देसाई, वसंतराव पाटील, सुभाष शिंदे, पांडुरंग मोहिते, संभाजी दमामे, उदयसिंह शिंदे, महिंद्र मोहिते, नितीन खरात उपस्थित होते. (वार्ताहर)इंद्रजित मोहिते यांच्याकडून प्रतिसभा- कृष्णा कारखान्याच्या वार्षिक सभेला कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, मदनराव मोहिते व त्यांच्या समर्थकांना प्रवेश दिला नाही. यामुळे सभेच्या बाहेरील बाजूसच डॉ. मोहिते यांनी प्रतिसभा घेतली. यावेळी त्यांनी, ७ नोव्हेंबरला आम्ही शेतकरी मेळावा घेऊन ‘कृष्णा’च्या विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा पंचनामा सभासदांसमोर करणार असल्याचे स्पष्ट केले. कारखान्याची बिघडलेली आर्थिक परिस्थिती झाकून नेण्यासाठी सत्ताधाऱ्यांनीच झुंडशाही करुन ही सभा गुंडाळल्याचा आरोपही त्यांनी केला.- कारखान्याच्या सभेपूर्वी माजी अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांचा सत्कार कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक अशोक नलवडे यांच्याहस्ते पुष्पहार घालून केला. उपाध्यक्ष सुरेश पाटील, माजी संचालक जगदीश जगताप, उमेश पवार आदी उपस्थित होते.
कृष्णा कारखान्याच्या सभेत गदारोळ
By admin | Published: September 30, 2014 12:12 AM