सांगली : साखर कारखाना काढून आपण पाप केले, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींना वाटत असेल तर, त्यांनी हडप केलेला कारखाना पुन्हा कमी किमतीत संबंधितांना परत करून पापाचे प्रायश्चित्त करावे, अशी टीका खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.
शेट्टी म्हणाले की, साखर उद्योगासाठी यापुढे पॅकेज देणार नाही म्हणणाºया गडकरींनी कारखाने व साखर उद्योगातून मिळालेल्या कराचे काय केले, हे जनतेला सांगावे. मागील जन्मी पाप केले म्हणून कारखाना काढला, असेही त्यांनी वक्तव्य केले. एकप्रकारे ते कारखानदारांचीच बाजू मांडत आहेत. भाजप नेत्यांकडील साखर कारखान्यांची संख्या वाढत असल्याने बहुधा अशी मते व्यक्त होत आहेत. साखर उत्पादन वाढल्यामुळे दराचा प्रश्न निर्माण झाल्याची दिशाभूल करणारी माहिती गडकरी देत आहेत. वास्तविक केंद्रानेच गतवेळी पाकिस्तानसह अन्य देशांमधून साखर आयात केल्यामुळे यंदा साखरेच्या दराचा प्रश्न निर्माण केला आहे.एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकºयांना दर देण्यासाठी राज्याची तिजोरी रिकामी करून म्हणून घोषणा करतात आणि त्यांच्याच पक्षाचे केंद्रीय मंत्री गडकरी मात्र साखर उद्योगाला पॅकेज मिळणार नाही म्हणून ठामपणे सांगत आहेत. मुख्यमंत्र्यांना साखर उद्योगातील काही कळत नाही, असे गडकरींना वाटत आहे का? कारखाने ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, असे ते म्हणत असले तरी, सोन्याची अंडी कारखानदार आणि सरकारच्याच पदरात पडली आहेत. शेतकरी मात्र संघर्ष करीत आहेत. कारखाने इतकेच अडचणीत असतील तर, मग कारखान्यांसाठी मोठ्या प्रमाणावर प्रस्ताव का दाखल होत आहेत, याचे उत्तर सरकारने द्यावे. सरकारचा हा दुटप्पीपणा आहे. एकरकमी एफआरपीच्या मुद्द्यावरही आम्ही ठाम आहोत. त्यामुळे येत्या १ जानेवारी रोजी कोल्हापुरात साखर सहसंचालकांच्या कार्यालयावर आम्ही मोर्चा काढणार आहोत.कोण गुडघे टेकणार ते कळेल!कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टींना गुडघे टेकायला लावू, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी केले होते. त्याविषयी शेट्टी म्हणाले की, घोडेमैदान लांब नाही. कोण गुडघे टेकणार आणि कोण माती खाणार हे त्यांनाही लवकरच कळेल, असा इशारा शेट्टींना यावेळी दिला.रस्ते ‘बीओटी’तूनच होणारदोन्ही शासनाकडून वारंवार महामार्गासाठी निधीची घोषणा होत आहे. कोट्यवधी रुपयांची तरतूद केल्याचे ते सांगत आहेत, पण या कामांमागे ‘बीओटी’ दडले आहे. सरकार निधीतून रस्ते करणार की खासगीकरणातून, हे स्पष्ट करावे. टोल लावून हे सरकार रिकामे होईल. पुढीलवेळी लोकांचा संताप सहन करायला ते नसतील, असे शेट्टी म्हणाले.आघाडीसाठी अटीसंपूर्ण कर्जमाफी, दीडपट हमीभाव अशा दोन गोष्टींचा जाहीरनाम्यात समावेश केला तरच आम्ही आघाडीत सहभागी होऊ, असे शेट्टी म्हणाले.