मिरज : मिरजेत रेल्वे इंधनचोरीचे प्रकार सुरूच असून, मिरज रेल्वे यार्डात वॅगनमधून काढलेले ६०० लिटर डिझेल रेल्वे सुरक्षा दलाने पकडले. यावेळी आठ ते दहा जणांची इंधन चोरांची टोळी अंधारात पसार झाली. याबाबत रेल्वे सुरक्षा दलाने गुन्हा दाखल करून सुमारे साठ हजार रुपये किमतीचे डिझेल जप्त केले आहे. या घटनेमुळे रेल्वे सुरक्षा दलाच्या सुरक्षा आयुक्तांनी मिरजेला भेट देऊन पाहणी केली.मिरजेत रेल्वेस्थानकाजवळ भारत पेट्रोलियम व इंडियन ऑइलचे इंधन डेपो आहे. येथून सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांत भारत पेट्रोलियमच्या २२० व इंडियन ऑइलच्या २०० पेट्रोलपंपांना मिरजेतून इंधन पुरवठा होतो. दोन्ही डेपोत सुमारे ५५ लाख लिटर पेट्रोल व १८० लाख लिटर डिझेल साठ्याची क्षमता आहे.रेल्वे यार्डात रात्रीच्या वेळी रेल्वे पोलिस व सुरक्षा दलाची गस्त असतानाही चोरीचे प्रकार सुरूच आहेत. चार दिवसांपूर्वी मिरज रेल्वे यार्डात मध्यरात्री वॅगनमधून चोरटे डिझेल काढत असताना रेल्वे सुरक्षा दलाच्या शिपायाने हटकल्यानंतर सुमारे आठ ते दहा चोरट्यांनी पलायन केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाचे निरीक्षक सतवीर सिंग यांच्यासह पथकाने पाहणी केली. यावेळी तेथे सहाशे लिटर डिझेल प्लास्टिक पिशव्यांत भरून झुडपात लपवून ठेवल्याचे आढळले. चोरटे सोडून गेलेली एक दुचाकीही ताब्यात घेण्यात आली आहे.इंधनचोरांविरुद्ध गुन्हा दाखल करून रेल्वे सुरक्षा दलाने त्यांचा शोध सुरू केला आहे. गेल्या महिन्यात सोलापूर येथील इंधन डेपोतही असाच प्रकार घडला असल्याने रेल्वे सुरक्षा दलाचे मंडल सुरक्षा आयुक्त इंद्रजित पोवार यांनी मिरजेला भेट देऊन रेल्वे यार्डाची पाहणी केली. भारत पेट्रोलियम व इंडियन ऑइल डेपोच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना इंधनचोरी रोखण्यासाठी उपाययोजनांबाबत सूचना दिल्या.
टँकरमधूनही इंधनचोरीरेल्वे वॅगनसह इंधन डेपोतून इंधन भरून पेट्रोलपंपांना पुरवठा करण्यासाठी जाणाऱ्या टँकरमधूनही पेट्रोल व डिझेल चोरी करण्यात येतात. रेल्वे वॅगन व टँकरमधून इंधनचोरी करणाऱ्या वेगवेगळ्या टोळ्या सक्रिय आहेत. चार वर्षांपूर्वी इंधनचोरीत सहभाग आढळल्याने एका पोलिस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली होती.