फोटो : करंजवडे येथे गजाननराव पाटील दादा जन्मशताब्दी सोहळ्यात बोलताना कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार डॉ. विनय कोरे, मृणाल पाटील, आदी.
ऐतवडे बुद्रुक : गजाननराव पाटील दादा हे स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर या दोन कालखंडांशी संबंधित असणारे सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा एकूणच जीवन प्रवाह हा समाजाला विकासाच्या दिशेने घेऊन जाणारा ठरला. दादांच्या सामाजिक वाटचालीचा विचार करताना हा जन्मशताब्दी सोहळा म्हणजे एक गौरवशाली इतिहासच असल्याचे मत कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी व्यक्त केले.
करंजवडे (ता. वाळवा) येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गजाननराव पाटील यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार मानसिंगराव नाईक, आमदार डॉ. विनयरावजी कोरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या पत्नी किरणताई वळसे-पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव मृणाल पाटील, राहुल महाडिक, विश्वनाथ डांगे, धैर्यशील पाटील, शिवाजीराव साळुंखे, राजेंद्र शेलार, आदी उपस्थित होते.
आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, मोठी जमीनदारी असतानाही दादांनी शिक्षणाला फार महत्त्व दिले. त्यामुळेच त्यांचा व करंजवडेवासीयांचा शैक्षणिक विकास घडला आहे.
आमदार डॉ. विनयरावजी कोरे म्हणाले, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, व्यक्तिगत व कौटुंबिक अशा सर्वच स्तरावरती यशस्वी वाटचाल करणारे गजाननराव पाटील एक समाजशील अवलिया होते.
माजी आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले, गजाननराव पाटील यांच्या विचाराचा व कर्तृत्वाचा कानोसा घेतल्यास निश्चितपणे भविष्याला एक दिशादर्शक, आशादायक किनारा लाभू शकतो.
कार्यक्रमाचे नियोजन मृणाल पाटील युवा मंचने केले. यावेळी प्रमोद पाटील, सुरेश पाटील, सुधीर जंगम, सुनील पाटील, अंकुश पाटील, माणिक पाटील, रामराव पाटील, संदीप भिडे, महेश जोशी, उपसरपंच संगीता लवटे, वनिता पाटील, वंदना कांबळे, आदी उपस्थित होते.