युनूस शेख
इस्लामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने येथे सुरू असलेल्या शिवार कृषी प्रदर्शनात आलेला दीड टन वजनाचा गजेंद्र रेडा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. गजेंद्र रेड्याची मोठी चर्चा रंगली आहे ती त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. काल, शुक्रवारी त्याने पाचव्या वर्षात पदार्पण केले. त्याचा जंगी वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याला पाहण्यासाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली. इस्लामपुर येथील शासकीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर शिवार कृषी प्रदर्शन भरले आहे. या प्रदर्शनात गजेंद्र रेड्याची हजेरी लागल्याने शेतकऱ्यांची या रेड्याला बघण्यासाठी एकच झुंबड उडाली आहे. कृषी प्रदर्शनात सर्वांचे आकर्षण असणारा दीड टन वजनाचा गजेंद्र रेडा. शुक्रवारी पाच वर्षाचा झाला. त्याचा वाढदिवस साजरा केला गेला.
महिलांनी औक्षण केले तर गजेंद्रचा केक स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे, निमंत्रक भागवत जाधव यांनी कापला. राज्यभरात तो अनेक कृषी प्रदर्शनात गर्दी खेचत असताना त्याच्या वाढदिवसाचा व्हीडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने नागरिक त्याला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी करत आहेत.कर्नाटक मधील मुंगसुळी या गावातील विलास नाईक हे पशुपालक शेतकरी या गजेंद्रचे मालक आहे. गजेंद्र त्याच्या वजनासाठी विख्यात आहे. त्याचे सुमारे दीड टन वजन असल्याने गजेंद्र जिथे जातो तिथे त्याचा तोरा कायमच असतो. काही दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याने या रेड्याला तब्बल ८० लाखांची बोली लावली होती. मात्र या रेड्याच्या मालकाने त्याला विकण्यास मनाई दाखवली.
सध्या गजेंद्र रेड्याला एक कोटीला खरेदी करण्याची तयारी दाखवली आहे. परंतु गजेंद्र घरच्या म्हशीची पैदास असल्यामुळे त्याच्या मालकाने त्याला विकण्यास स्पष्ट नकार दिला आहे. गजेंद्र हा मुरा जातीचा रेडा आहे. देशातील अनेक कृषी प्रदर्शनात गजेंद्र रेड्याने हजेरी लावली आहे आणि प्रत्येक कृषी प्रदर्शनात गजेंद्र हा प्रमुख आकर्षणाचा केंद्र ठरत असतो. 'असा' आहे त्याचा खुराक दीड टन वजन आणि एक कोटी रुपयांचा गजेंद्र रेडा आपल्या वजनामुळे आणि किंमतीमुळे जगविख्यात आहे. गजेंद्र याचे वजन ज्याप्रकारे सर्वांना त्याच्याकडे पाहण्यास भाग पाडते अगदी त्याच प्रकारे त्याचा खुराक देखील पाहण्यासारखाच आहे. गजेंद्र एका दिवसात १५ किलो दूध, तीन किलो भरडा, तीन किलो आटा, पाच किलो सफरचंद, याशिवाय ऊस खात असतो.