लेंगरे/खानापूर : लेंगरे (ता. खानापूर) गावचे मदुराईस्थित गलाई व्यावसायिक युवराज शिंदे, सरिता शिंदे या दाम्पत्याने लेकीच्या स्मरणार्थ मोही येथील जलहारी शबनाक वृद्धाश्रमास १५ लाख रुपयांच्या तीन खोल्या बांधून देण्याचा निर्णय घेतला. त्या कामाचे भूमिपूजन गुरुवारी झाले.लेंगरे येथील युवराज शिंदे व सरिता शिंदे यांना दोन लेकी. गलाई व्यवसाय भरभराटीत असतानाच सुखी आयुष्यात मीठाचा खडा पडला. हसती खेळती सहा वर्षाची लाडकी लेक रिया (समृद्धी) अचानक आजारी पडली. काही कळण्यापूर्वीच कॅन्सरने तिचे निधन झाले. कुटुंबाला हा मोठा धक्का होता. त्यातून सावरत त्या लाडक्या लेकीच्या स्मरणार्थ समाजोपयोगी काम करण्याचा संकल्प केला.मोही येथे वृद्धांना राहण्यासाठी खोल्यांच्या बांधकामाचा पायाभरणी समारंभ शिंदे दाम्पत्याच्या हस्ते भूमिपूजन करून झाला. यावेळी युवराज शिंदे म्हणाले, रियाचे निधन आमच्यासाठी खूप मोठा धक्का होता. रिया मनाने खूप हळवी होती. तिला गरिबांना मदत करायला खूप आवडायचे. तिच्या स्मरणार्थ वृद्धाश्रमास इमारत बांधून देण्याचा निर्णय घेतला. यातून लेकीच्या स्मृती जतन करण्याचा प्रयत्न आहे.यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, सुहास शिंदे, राष्ट्रवादीचे सुशांत देवकर, लक्ष्मीबाई पाटील, सुनील पाटील, उपसरपंच राजेंद्र मोहिते देशमुख, श्रीरंग शिंदे, मच्छिंद्र पाटील, रशीद मुजावर, संभाजी जाधव, दत्तात्रय शिंदे, दत्तात्रय गायकवाड तसेच वृद्धाश्रमाचे अध्यक्ष राजेश गडकरी, संचालिका प्रतिभा गुरव, कर्मचारी आणि ३९ महिला व पुरुष वृद्ध उपस्थित होते.
Sangli: लेंगरेच्या दाम्पत्याची लेकीच्या स्मरणार्थ वृद्धाश्रमास मदत, १५ लाखात खोल्या बांधून देणार
By संतोष भिसे | Published: December 14, 2023 5:53 PM