सांगली : महापालिका आयुक्तांना विकास कामांबाबत सुबुद्धी दे, असे साकडे गणरायाला घालत शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महाआरती केली. आयुक्तांच्या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादीचे तिसºया दिवशीही आंदोलन सुरूच होते. विकासकामे सुरू झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते यांनी दिला.
महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आयुक्तांच्या कारभाराविरोधात एल्गार पुकारला आहे. प्रभागातील विकासकामे अडविली जात असून ती मार्गी लागावीत, या मागणीसाठी सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. गेल्या तीन दिवसांपासून पालिका मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन सुरू आहे. राष्ट्रवादीच्यावतीने गणरायाच्या आरतीचे आयोजन केले होते. सुरूवातीला गणरायाच्या प्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली. आयुक्तांना विकास कामांबाबत सुबुद्धी दे, असे साकडेही घातले गेले. आंदोलनस्थळी डिजिटल फलकही लावण्यात आला आहे. त्यावर ‘आता तरी विकासकामे थांबवू नका’, असे आयुक्तांना आवाहन केले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या आंदोलनाची जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी दखल घेतली आहे. शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, सागर घोडके, विनया पाठक, प्रकाश व्हनकडे, मनोज भिसे यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन निवेदन दिले. महापालिकेच्या अंदाजपत्रकात समाविष्ट असलेल्या कामांना मंजुरी देऊन वर्कआॅर्डर द्याव्यात, नगरसेवकांना इंटरेस्ट असल्याचे सांगून विकासकामे अडविली जात आहेत, त्यातून जनतेची दिशाभूल होत असून संबंधितावर योग्य ती कारवाई करावी, गेल्या दीड वर्षात आयुक्तांनी १८८ कोटीची कामे केली असतील, तर त्याच्या वर्कआॅर्डर कधी देण्यात आल्या, हे जाहीर करावे, आदी मागण्या या निवेदनात केल्या.
आंदोलनात नगरसेवक विष्णू माने, प्रा. पद्माकर जगदाळे, अल्लाउद्दीन काझी, आशा शिंदे, संगीता हारगे, प्रियांका बंडगर, प्रार्थना मदभावीकर, अंजना कुंडले, स्नेहल सावंत, आनंदा देवमाने, अभिजित हारगे, प्रसाद मदभावीकर आदी उपस्थित होते.जिल्हाधिकाºयांची : मध्यस्थीसंजय बजाज व शेडजी मोहिते यांनी, नगरसेवक-पदाधिकारी विरुद्ध आयुक्त या सुरू असलेल्या संघर्षात जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी मध्यस्थी करावी, यासाठी साकडे घातले. यावेळी श्री. काळम-पाटील यांनी आयुक्त-नगरसेवकांना एकत्र बसवून दोन दिवसात चर्चा घडवू. कुठे घोडे अडले हे तपासू, असे आश्वासन दिल्याचे बजाज यांनी सांगितले. तोपर्यंत आंदोलन थांबवावे, अशी मागणी केली. परंतु आंदोलकांनी निर्णय झाल्यावर माघार घेऊ, असा पवित्रा घेतला आहे.