सांगली : गणपती उत्सव, नवरात्र उत्सव हे आता इव्हेंट झाले आहेत. सणांचा बट्ट्याबोळ सर्वांनी केला आहे. आपला कोण, परका कोण, वैरी कोण अन् कैवारी कोण हे न कळणारी हिंदू जमात महामूर्ख आहे, असे मत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी व्यक्त केले.सांगलीत गुरुवारी घटस्थापनेदिवशी पहाटे सांगली शहरातून परंपरेप्रमाणे दुर्गामाता दौड काढण्यात आली. दुर्गामाता मंदिरात दौड आल्यानंतर याठिकाणी ध्येयमंत्र, प्रेरणामंत्र व आरती म्हणण्यात आली. त्यानंतर संभाजी भिडे यांनी धारकऱ्यांना मार्गदर्शन केले.ते म्हणाले, गणपती उत्सवाचा आता चोथा झाला आहे. नवरात्रोत्सवाचा बट्याबोळ केला जात आहे. परंपरेत नको त्या गोष्टी सुरु झाल्या आहेत. उत्सवात दांडिया खेळला जातोय. हा दांडिया हिंदू समाजाला चुकीच्या दिशेला घेऊन जात आहे. हे प्रकार बंद झाले पाहिजेत. आम्हाला या गोष्टी मान्य नाहीत. त्या बंद पाडल्या जातील.जगाच्या पाठीवर असलेल्या १८७ देशांपैकी ७६ राष्ट्रांनी भारतावर आक्रमण केले आहे. बेशरम लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान आहे. चीन हे आपले शत्रूराष्ट्र असतानाही ‘हिंदी-चीनी भाई भाई’चा नारा देणारे पंतप्रधान आपल्याला मिळाले, हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे. तसाच नारा हिंदू-मुस्लिम एकतेचा दिला जातो. आपले कोण, परके कोण, शत्रू अन् मित्र, वैरी अन् कैवारी कोण हे न कळणारी आपली हिंदू जमात आहे.शिवाजी महाराजांनी हिंदू समाजाला जगाचा बाप व्हायचा मार्ग शिकवलाय. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या विचाराचा देश घडवायचा आहे. तो घडविण्याची ताकद आम्हाला मिळावी, अशी प्रार्थना आम्ही आईच्या चरणी करीत आहोत.
पोलिसांनी पळायला हवंकाही माता-भगिनींनी एकत्र येऊन यापुढे स्वतंत्र दुर्गामाता दौड काढावी. सण, उत्सवात चांगल्या प्रथा महिलांनी सुरु कराव्यात. पोलिसांनी गुराख्यासारखं दौडीसोबत येऊ नये. त्यांनीही डोक्यावर टोपी घालावी. त्यांनीही पळायला हवे, असे भिडे यांनी केले.
हे थुंकण्याच्या लायकीचे विषयराजकारण, सत्ताकारण, अर्थकारण शूद्र आहे. हे थुंकण्याच्या लायकीचे सुद्धा विषय नाहीत. शिवाजी महाराजांच्या विचारांचा भारत करण्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत, असे मत भिडे यांनी मांडले.