सांगली : सर्वत्र हाहाकार माजवून देणाऱ्या कोरोनावरील लस दृष्टिक्षेपात आहे. प्रशासकीय पातळीवरून लस देण्यासाठीचे नियोजनही करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना लसीच्या नोंदणीखाली फोन करून ओटीपी मागून घेत ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सुरू झाले आहेत. त्यामुळे कोणालाही आपल्या मोबाईलवर आलेला ओटीपी देऊ नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी केले आहे.
मोबाईलवर संपर्क साधून बँकेतून बोलत असल्याचे सांगत एटीएमविषयक माहिती घेऊन फसवणुकीचे अनेक प्रकार जिल्ह्यात घडले आहेत. याबाबत जनजागृती करूनही असे प्रकार घडत आहेत. या पार्श्वभूमीवर ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांनी आता आपला मोर्चा कोरोना लसींकडे वळवला आहे.
पुढील महिन्यापासून चार टप्प्यांमध्ये कोरोनावरील लसीकरण सुरू होणार आहे. कोरोनाचा संसर्ग व त्यामुळे वर्षभर झालेली हानी लक्षात घेता प्रत्येक घटकाला लसीची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यात असा प्रकार कमी असला तरी, इतरत्र काेराेना लसीसाठी नोंदणी करावयाची असल्याचे सांगून नागरिकांना फोन येत आहेत. फोन करणाऱ्या व्यक्तीकडून आधार क्रमांक, ई-मेल आयडी मागणी केली जाते. नोंदणी पूर्ण करण्यासाठी मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक देण्याची विनंती केली जाते. नागरिकांनी एकदा का हा ओटीपी क्रमांक दिला की त्याच्या बँक खात्यातील सर्व रक्कम वजा होत आहे. बँक खाते निरंक झाल्यानंतरच आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येत आहे.
कोट
कोरोना लसीच्या नोंदणीसाठी कोणालाही फोन केले जात नाहीत. तरीही नवीन सायबर गुन्ह्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून आपली वैयक्तिक माहिती कोणासही देऊ नये.
संजय क्षीरसागर, सहा. पाेलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे