सांगली : बेवरेजेस कंपनीत तयार करण्यात आलेल्या उत्पादनांच्या वितरणाची हमी व व्यवसायात जादा नफा मिळवून देण्याच्या आमिषाने सांगलीतील व्यापाऱ्यास मुंबईतील कुटुंबाने तब्बल सहा कोटी ५३ लाख २५ हजार रूपयांना गंडा घातला. याप्रकरणी तुषार राजेश मुंदडा (वय ३७, रा. आप्पासाहेब पाटील नगर, सांगली) यांनी धर्मेंद्र हंसराज सिंग, सत्येंद्र हंसराज सिंग, रेणू सिंग आणि आदित्यराज सिंग (सर्व रा. बोरीवली, मुंबई) यांच्याविरोधात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या प्रकरणातील संशयित सिंग यांच्या हंसराज बेवरेजेस प्रा. लि व हंसराज ॲग्रोफ्रेश प्रा. लि. नावांच्या दोन कंपन्या आहेत. फिर्यादी मुंदडा सांगलीतील व्यापारी असून शहरातील आझाद चौकातील शिव मेरेडियन येथे त्यांचे कार्यालय आहे. २०१६ ते एप्रिल २०२१ या कालावधीत संशयितांनी मुंदडा यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हंसराज बेवरेजेस कंपनीत तयार हाेत असलेल्या उत्पादनाच्या वितरणासाठी सक्षम व्यक्ती हवी असून वितरणाची जबाबदारी देत असल्याचे आमिष संशयितांनी मुंदडा यांना दाखविले होते. याशिवाय या व्यवसायात जादा नफाही मिळवून देतो, असे सांगत कंपनीला असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी पैशाची मागणी केली होती.
वितरणाची जबाबदारी व त्यातून व्यवसायिक नफा मिळणार असल्याने फिर्यादी तुषार व त्यांचे भाऊ रवी यांना पैशाची मागणी केली होती. दोघांनीही संशयितांना तब्बल ६ कोटी ५३ लाख २५ हजार रूपये दिले होते.
इतकी मोठी रक्कम देऊनही संशयितांनी त्यांच्या कंपनीचा कोणताही माल वितरणास दिला नाही. शिवाय वेळोवेळी घेतलेली रक्कमही परत दिली नव्हती. मुंदडा यांनी रक्कम परत मिळविण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही ती परत मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर संशयित सिंग कुटुंबाविरोधात त्यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.