लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : येथील महात्मा गांधी वसतिगृहाकडे जिल्हा परिषद प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे मोठी दुरवस्था झाली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गांधी वसतिगृह अडगळीत गेले आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसून स्वच्छतागृहात घाणीचे साम्राज्य असल्याचा आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी सांगलीत केला. याबाबतचे निवेदनही त्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिले.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी, समाजकल्याण अधिकारी बाबासाहेब काम यांना मागण्यांचे निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, गांधी वसतिगृह हे जिल्ह्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांचे प्रेरणेचे प्रतीक आहे. या वसतिगृहात राहून जिल्ह्यातील विविध क्षेत्रात नामांकित कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व घडले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण पूर्ण करण्यासाठी एकमेव गांधी वसतिगृहाचा आधार आहे. या वसतिगृहाची सध्या खूपच वाईट अवस्था झाली आहे. स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, अभ्यासिका, लाईटची व्यवस्था नाही. हे वसतिगृह जिल्हा परिषदेपासून अत्यंत जवळ असूनही याकडे अधिकारी कधीच लक्ष देत नाहीत. यामुळे वसतिगृहाची दुरवस्था झाली आहे. या वसतिगृहामध्ये मूलभूत सुविधा त्वरित द्याव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश पाटील यांनी दिला आहे.
यावेळी जिल्हा सचिव तेजस सन्मुख, सोमनाथ टोणे, संदीप मुळीक, पृथ्वीराज यादव, अजित सनदी, नईम मुलाणी आदी उपस्थित होते.