Ganesh Chaturthi मिरज : गणेश विसर्जनासाठी मिरजेत जोरदार तयारी आज मिरवणूक : स्वागत कमानी सजल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 12:32 AM2018-09-23T00:32:58+5:302018-09-23T00:37:16+5:30
मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीला रविवारी सकाळी सुरुवात होत आहे. सुमारे १७५ सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचे सवाद्य मिरवणुकीने विसर्जन होणार आहे.
मिरज : मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीला रविवारी सकाळी सुरुवात होत आहे. सुमारे १७५ सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचे सवाद्य मिरवणुकीने विसर्जन होणार आहे. विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजेत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
१४० मंडळांच्या गणेश मूर्तींचे गणेश तलावात, मोठ्या मूर्तींची स्थापना केलेल्या ३४ मंडळांच्या गणेशमूर्तींचे कृष्णाघाटावर विसर्जन करण्यात येणार आहे. मिरवणूक मार्गावर दुतर्फा विविध पक्ष व संघटनांनी उभारलेल्या स्वागत कमानी विद्युत रोषणाईने झगमगत आहेत. ध्वनिक्षेपकावर प्रतिबंध असल्याने बँड, बॅँजो, झांज, ढोल, लेझीम व पारंपरिक वाद्यांचा वापर रात्री बारापर्यंत होणार आहे. कृष्णा घाट व गणेश तलाव येथे महापालिकेतर्फे यांत्रिक बोट, तराफा, क्रेन व निर्माल्य कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे.
मोठ्या मूर्तींचे कृष्णाघाटावर क्रेनव्दारे नदीपात्रात विसर्जन करण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्यासह जिल्ह्यातील पोलीस फौजफाटा मिरजेत बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आला आहे. मिरवणुकीसाठी सार्वजनिक मंडळांनी सजीव देखावे व आकर्षक सजावट केली आहे. मिरवणूक मार्गावर विश्वशांती मंडळ, मनसे, मराठा महासंघ, शिवसेना, हिंदू एकता, एकता मित्र मंडळ, संभाजी मंडळासह विविध मंडळांनी स्वागत कमानी उभारल्या आहेत. महापालिका, जनसुराज्य शक्ती, रिपाइं, शिवसेनेतर्फे स्वागत कक्ष उभारण्यात आले आहेत. मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही, उंच मनोरे व इमारतींवरुन पोलीस मिरवणुकीवर लक्ष ठेवणार आहेत. मिरवणुकीत मोठ्या आवाजाच्या ध्वनिक्षेपकाचा वापर करणाऱ्या व उशिरा विसर्जन करणाºया मंडळांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शहरातील संवेदनशील ठिकाणांवर जादा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मिरज शहर व ग्रामीण भागात पोलिसांनी संचलन केले आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोनची नजर
मिरवणूक मार्गावर गणेश तलाव ते पोलीस ठाण्यापर्यंत २० ठिकाणी व प्रत्येक स्वागत कमानीवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. ड्रोन व सीसीटीव्ही कॅमेºयाव्दारे मिरवणुकीवर नजर ठेवण्यात येणार आहे. गणेशोत्सव बंदोबस्तासाठी विशेष पोलीस अधिकारी, पोलीस मित्र व निवृत्त सुरक्षा अधिकाºयांना विशेष अधिकार देऊन त्यांची मदत घेण्यात येत आहे.
मूर्तीच्या विसर्जनाची जबाबदारी पोलिसांवर
चार ते पाच मंडळांसाठी एका पोलीस कर्मचाºयाची नियुक्ती करून त्या मंडळांच्या मूर्तीच्या विसर्जनाची जबाबदारी त्या पोलिसावर सोपविण्यात आली आहे. विसर्जनादिवशी महिलांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया आणि दामिनी पथके आहेत. महिलांची गर्दी असलेल्या तीस ठिकाणी चार पथके कार्यरत असणार आहेत. साध्या वेशातील पथक, ध्वनी प्रदूषणविरोधी पथक, व्हीडीओ चित्रीकरण पथक, गुन्हे तपास पथक, मोबाईल गस्त पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी शहरात येणाºया हजारो भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केल्याचे पोलीस उपअधीक्षक अनिकेत भारती यांनी सांगितले.
वाहतूक व्यवस्थेत बदल
विसर्जन मिरवणुकीसाठी शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला असून, बाहेरून येणाºया वाहनांना मिरवणूक मार्गावर प्रतिबंध करण्यात आला आहे. मिरवणूक मार्गावरील रस्ते, बोळ बंद करण्यात आले आहेत. प्रमुख सात चौक व मिरवणूक मार्गावरील उंच इमारतींवर शस्त्रधारी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मिरवणुकीतील गर्दीत हरवलेल्या, सापडलेल्या लहान बालके व व्यक्तींसाठी पोलीस मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहे. मिरवणूक मार्गावर विविध ठिकाणी तात्पुरत्या पोलीस चौक्यांची निर्मिती करण्यात आली आहे.
मिरवणुकीत मोठ्या आवाजाच्या ध्वनिक्षेपकाच्या प्रतिबंधासाठी वाद्यांच्या ध्वनी मापनासाठी उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाºयांची तीन पथके आहेत. रविवारी सकाळपासून पोलीस बंदोबस्तास सुरुवात होत असून, सोमवारी सकाळपर्यंत २४ तास मिरवणूक सुरू राहण्याची शक्यता आहे.