सांगली : महापालिकेने गणेश विसर्जनाची जय्यत तयारी केली आहे. कोरोनामुळे विसर्जनावेळी गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आयुक्त नितीन कापडणीस यांनी विसर्जन तयारीचा आढावा घेतला. नदीकाठवरील घाटाची पाहणी केली.
महापालिका क्षेत्रात गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. कोरोनामुळे यंदा गणेशोत्सावर निर्बंध आहेत. त्यात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे गणेश विसर्जनावेळी गर्दी टाळण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सांगली, मिरज व कुपवाड या तीन शहरात २८ कृत्रिम विसर्जन कुंड तयार करण्यात आले आहेत. तसेच ७ ठिकाणी कृत्रिम तलाव उभारले आहेत. नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी गणेश मूर्ती दान करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. मूर्तीदानसाठी २२ केंद्रे सुरू केली आहेत.
दरम्यान, आयुक्त नितीन कापडणीस यांनी विसर्जन तयारीची पाहणी केली. कृष्णा नदीकाठवरील सरकारी घाट, त्याची स्वच्छता, कृत्रिम कुंड, मूर्तीदान केंद्रालाही त्यांनी भेट दिली. या वेळी वैद्यकीय अधिकारी डाॅ. रवींद्र ताटे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, धनजंय कांबळे आदींसह स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.