लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीला मंगळवारी सकाळी सुरुवात होणार आहे. सुमारे १६८ सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींचे सवाद्य मिरवणुकीने विसर्जन होणार आहे. विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजेत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.मंगळवारी सकाळपासून मिरवणुकांना सुरुवात होत आहे. मोठ्या मूर्तींची स्थापना केलेल्या ३४ मंडळांच्या गणेशमूर्तींचे कृष्णाघाटावर व १३४ मंडळांच्या गणेशमूर्तींचे गणेश तलावात विसर्जन करण्यात येणार आहे. मिरवणूक मार्गावर दुतर्फा विविध पक्ष व संघटनांनी उभारलेल्या स्वागत कमानी विद्युत रोषणाईने झगमगत आहेत. डॉल्बीवर प्रतिबंध असल्याने बँड, बेंजो, झांज, ढोल, लेझीम व पारंपरिक वाद्यांचा वापर रात्री १२ वाजेपर्यंत होणार आहे. कृष्णा घाट व गणेश तलाव येथे महापालिकेतर्फे यांत्रिक बोट, तराफा, क्रेन व निर्माल्य कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे. मोठ्या आकाराच्या मूर्तींचे कृष्णाघाटावर क्रेनद्वारे नदीपात्रात विसर्जन करण्यात येणार आहे.दरम्यान, विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्यासह बंदोबस्तासाठी जिल्ह्यातील पोलिस फौजफाटा मिरजेत पाचारण करण्यात आला आहे. मिरवणुकीसाठी सार्वजनिक मंडळांनी सजीव देखावे व आकर्षक सजावट केली आहे. मिरवणूक मार्गावर विश्वशांती मंडळ, मनसे, मराठा महासंघ, शिवसेना, हिंदू एकता, एकता मित्र मंडळ, धर्मवीर संभाजी मंडळासह विविध मंडळांनी स्वागत कमानी उभारल्या आहेत. महापालिका, जनसुराज्य शक्ती, रिपाइं, शिवसेनेतर्फे स्वागत कक्ष उभारण्यात आले आहेत. मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही, उंच मनोरे व इमारतींवरुन पोलिस मिरवणुकीवर लक्ष ठेवणार आहेत. मिरवणूक रेंगाळत ठेवून उशिरा विसर्जन करणाºया मंडळांवर व मद्यपान करुन शांतताभंग करणाºयांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. विसर्जनासाठी वेळेचे बंधन न पाळणाºया मंडळांवर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. शहरात संवेदनशील ठिकाणी जादा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मिरज शहर व ग्रामीण भागात पोलिसांनी संचलन केले आहे.सीसीटीव्ही कॅमेरे : सोळा ठिकाणीमिरवणूक मार्गावर गणेश तलाव ते पोलिस ठाण्यापर्यंत १६ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. फिरत्या कॅमेºयाद्वारे मिरवणुकीवर नजर ठेवण्यात येणार आहे. मिरवणूक मार्गावर उभारण्यात आलेल्या प्रत्येक स्वागत कमानीवर दोन सीसीटीव्ही, अशा तीस सीसीटीव्ही कॅमेºयांची व्यवस्था करण्यात आली आहे. महिला छेडछाडविरोधी पथक, मद्यपान करून वाहन चालविणाºयांवर कारवाईसाठी पथक, दंगल नियंत्रण पथक अशी साध्या वेशातील पथके मिरवणुकीत कार्यरत राहणार आहेत. गणेशोत्सव बंदोबस्तासाठी छात्रसैनिक व पोलिस मित्रांना विशेष अधिकार देऊन त्यांची मदत घेण्यात येत आहे.वाहतूक व्यवस्थेत बदलविसर्जन मिरवणुकीसाठी शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला असून, बाहेरून येणाºया वाहनांना मिरवणूक मार्गावर प्रतिबंध करण्यात आला आहे. मिरवणूक मार्गावरील दुय्यम रस्ते, बोळ बंद करण्यात आले आहेत. प्रमुख सात चौक व मिरवणूक मार्गावरील उंच इमारतींवर शस्त्रधारी पोलिस तैनात केले आहेत. गर्दीत हरविणाºया व सापडणाºया लहान बालकांसाठी व व्यक्तींसाठी पोलिस मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहे. बंदोबस्तासाठी शहर व मिरवणूक मार्गाचे तीन विभाग करून विविध ठिकाणी तात्पुरत्या पोलिस चौक्यांची निर्मिती केली आहे.ध्वनिमापनासाठी तीन पथकेपोलिसांच्या कठोर पवित्र्यामुळे यावर्षी नवव्या दिवसापर्यंत तरी डॉल्बीचा वापर झालेला नाही. मंगळवारच्या मिरवणुकीत वाद्यांच्या ध्वनिमापनासाठी उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाºयांची तीन पथके नियुक्त केली आहेत. मंगळवारी सकाळपासून पोलिस बंदोबस्तास सुरूवात होत असून, बुधवारी सकाळपर्यंत २४ तास मिरवणूक सुरू राहण्याची शक्यता आहे.
मिरजेमध्ये आज रंगणार गणेश विसर्जन मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2017 11:42 PM