इस्लामपूर : कडकनाथ कोंबडी पालनातून ५०० कोटीहून अधिकचा घोटाळा केल्याप्रकरणी फरारी असलेला रयत क्रांती संघटनेचा कार्यकर्ता गणेश हौसेराव शेवाळे याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मंगळवारी रात्री ताब्यात घेतले. या प्रकरणातील मुख्य संशयित सुधीर मोहिते अद्यापही फरारी आहे. तो परदेशात असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात कमी कालावधित जादा मोबादला देण्याचे आमिष दाखवून रयत व महारयत अॅग्रो कंपनीचा संस्थापक सुधीर मोहिते याने राज्यासह कर्नाटकातील हजारो शेतकऱ्यांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. पहिल्या वर्षभरात त्याने प्रामाणिकपणे शेतकऱ्यांना परतावा केला. त्यावर विश्वास ठेवत हजारो शेतकºयांनी यामध्ये गुंतवणूक केली. या साखळीत त्याला संदीप मोहिते, हणमंत जगदाळे, गणेश शेवाळे, विनय शेंडे यांची साथ होती. यातील संदीप मोहिते, हणमंत जगदाळे यांना पोलिसांनी यापूर्वीच ताब्यात घेतले आहे.
मंगळवारी रात्री बहे येथील गणेश शेवाळे यालाही अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश मिळाले. अद्याप मुख्य सूत्रधार सुधीर मोहिते, विनय शेंडे फरारी आहेत. हजारो शेतकºयांनी या फसवणूकप्रकरणी पोलिसांत गुन्हे दाखल केले असले तरी, त्याचा तपास म्हणावा त्या गतीने नाही. सध्या या फसवणूक प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे आहे.