मिरज :मिरजेतील ऐतिहासिक गणेश तलावाच्या प्रवेशद्वारास माजी संस्थानिक गंगाधरराव पटवर्धन यांनी ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर तलावाच्या प्रवेशद्वारांना कुलूपे ठोकली होती. रविवारी जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या नेतृत्वाखाली गणेश भक्तांनी गणेश तलावाच्या प्रवेशद्वाराचे कुलप तोडून तलाव खुला केला.
माजी संस्थानिक पटवर्धन यांनी दोन दिवसांपूर्वी तलावाच्या प्रवेशद्वारास कुलूप ठोकल्याने शहरात संतप्त पडसाद उमटले. संस्थानिक पटवर्धन यांनी तलावाच्या मालकी हक्काचा दावा करीत या मिळकतीत विनापरवाना प्रवेशास प्रतिबंधाचा फलक लावला होता. रविवारी समित कदम यांच्या नेतृत्वाखाली गणेश भक्तांनी गणेश तलावांच्या प्रवेशद्वाराचे कुलप हातोड्याने तोडून तलाव खुला करुन शहरातील गणेश विसर्जन प्रथेप्रमाणे ऐतिहासिक गणेश तलावातच होणार असल्याचे जाहीर केले.
यावेळी महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांनी संस्थानिक पटवर्धन यांच्याशी महापालिकेने वारंवार संपर्क साधून तलावाचा करार वाढविण्याची मागणी केली आहे. मात्र, त्यांनी त्यास सहकार्य केले नसल्याचे सांगितले. यामुळे न्यायालयात कॅव्हेट दाखल केल्याचेही सांगितले. यावेळी समीत कदम यांच्यासह माजी नगरसेवक गणेश माळी, बाबासाहेब आळतेकर, सलीम पठाण, के. के. कलगुटगी, ईश्वर जनवाडे आदी गणेश भक्त उपस्थित होते.