सांगली : जिल्ह्यामध्ये एकाच कालावधीत गणेशोत्सव आणि मोहरम हे सण साजरे होत आहेत. हे दोन्ही सण नागरिकांनी स्वयंशिस्तीत, शांततेत व उत्साही वातावरणात साजरे करावेत. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत, ध्वनीमुक्त गणेशोत्सव साजरा करावा. तसेच, सामाजिक सलोख्याने आणि सर्व यंत्रणांच्या परस्पर समन्वयाने हे दोन्ही सण कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून, आदर्शवत रीतीने साजरे करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी येथे केले.जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित गणेशोत्सव व मोहरम सणांच्या पार्श्वभूमिवर आयोजित शांतता समिती बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते.
गणेश उत्सव साजरा करण्यासाठी गणेश मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच मोहरमसाठी मुस्लीम बांधवांनी केलेल्या सूचनांची जिल्हा प्रशासन दखल घेईल, असे स्पष्ट करून जिल्हाधिकारी वि. ना. काळम पुढे म्हणाले, पोलीस, महापालिका आणि विद्युत विभाग यांच्यासह अन्य संबंधित सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने सूक्ष्म नियोजन करावे.
आपल्या स्तरावर बैठक घेऊन, सर्वांना शांततेत सण साजरा करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करावे. सण साजरे करताना आवाजाच्या मर्यादेबाबत मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे सर्वांनी काटेकोर पालन करावे.
ध्वनी प्रदुषणाबाबत तसेच वेळेच्या बाबतीत दिलेल्या आदेशाचेही पालन करावे. विहित नियमांचे पालन करून जनतेची कसल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. मिरवणुकीमध्ये सामाजिक आरोग्य व शांतता भंग होणार नाही, याबाबत काळजी प्रत्येकाने घ्यावी. तसेच, एक गाव एक गणपती या संकल्पनेचाही विचार करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा म्हणाले, पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यावर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी भर द्यावा. तसेच गणेशोत्सव साजरा करताना कायदा व सुव्यवस्थेस सर्वोच्च प्राधान्य द्यावे.
गणेशोत्सवाला कसल्याही प्रकारे गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी. दोन्ही सणांच्या पार्श्वभूमिवर उपविभाग आणि तहसील स्तरावर मोहल्ला समितींच्या एकत्रित बैठका घेण्यात याव्यात.
सण-उत्सव साजरे करताना गैरप्रकार घडू नयेत, यासाठी प्रशासनाबरोबर प्रत्येक नागरिकाने दक्षता घ्यावी. सोशल मीडियावर वॉच ठेवला जाणार असून, सोशल मीडियावर कुणीही अफवा पसरवू नये. कुणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी. काहीही अडचण असल्यास पोलीस विभागाशी संपर्क साधा.
जिल्ह्यात सकारात्मकतेने सण-उत्सव साजरे करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. तसेच, गणेशोत्सवासाठी संकलित केलेल्या वर्गणीतून अनावश्यक खर्चाला फाटा देवून केरळ आपद्ग्रस्तांना मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले.आयुक्त रवींद्र खेबुडकर म्हणाले, मंडळांना लागणाऱ्या विविध परवानग्यांसाठी एक खिडकी योजना राबविली जात असून यासाठी गणेशोत्सव मंडळानी वेळेत परवानग्या घ्याव्यात.
दोन्ही सणांसाठी महानगरपालिकेकडून आवश्यक सुविधा देण्यात येत आहेत. तसेच, सीसीटीव्हीची व्यवस्थाही करण्यात येत आहे. गणेशोत्सव काळात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला जाईल. तसेच, महिलांसाठी फिरते स्वच्छतागृह ठेवण्यात येईल. तसेच, गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करण्यात येईल. तसेच, जागोजागी निर्माल्य कुंडही ठेवण्यात येतील.
गणेश मंडळांनी रस्त्याच्या केवळ एक तृतीयांश भागच मंडपासाठी वापरायचा आहे. उर्वरित तीन चतुर्थांश भाग जनतेसाठी मोकळा ठेवायचा आहे. तसेच, नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांच्या खुदाईला अटकाव करण्यात आला आहे. त्यामुळे जर अशी खुदाई कुणी केली तर त्याच्यावर शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी कारवाई करण्यात येईल. यावेळी शांतता समितीच्या सन्माननीय सदस्यांनी गणेशोत्सवाबाबत आपली मते मांडली. तसेच, मुस्लीम बांधवांनी त्यांच्या सूचना मांडल्या.याप्रसंगी उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस दलातील अधिकारी, महावितरण, राज्य उत्पादन शुल्क, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यासह अन्य संबंधित शासकीय विभाग, शांतता समितीचे सन्माननीय सदस्य, सदस्या तसेच शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, मुस्लीम बांधव उपस्थित होते.