लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मिरज शहरातील बसस्थानक, रेल्वे स्थानक, शिवाजी चौक परिसरात वाटसरूंना अडवून लुटणाऱ्या नशेखोरांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. रियाज बडेसाब शेख (वय २९), वसीम राजू डिग्रजे (३३) आणि तबरेज अहमद शेख (२८, सर्व रा. ख्वाजा झोपडपट्टी, मिरज) अशी संशयितांची नावे आहेत.
महिन्याभरापासून मिरजेत वाटसरूंना अडवून लुटणाऱ्या नशेखोरांनी उच्छाद मांडला होता. गुरुवारी अवैध धंद्यांवर कारवाईसाठी एलसीबीचे पथक मिरज परिसरात गस्तीवर होते. यावेळी शहरातील बिसमिल्लाह हॉटेलच्या बाजूस काही तरुण गांजा ओढत बसल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने तिथे जात तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गांजा ताब्यात घेत तिघांचीही शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मिरज शहरातील बसस्थानक, मिरज रेल्वे स्थानक परिसर, पुजारी चौक, शिवाजी चौक परिसरात वाटसरूंना अडवून त्यांच्याकडून मोबाईल, रोख रक्कम काढून घेतल्याचे त्यांनी चौकशीत सांगितले. या तिघांवरही मिरज पाेलिसांत घरफोडी, चोरी, गांजा ओढणे यासारखे गुन्हा दाखल आहेत.
पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शखानाली मारुती साळुंखे, संजय कांबळे, हेमंत ओमासे, शशिकांत जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.