सांगली : वसंतदादा मार्केट यार्ड जवळील रिलायन्स ज्वेल्सवर रविवारी भर दिवसा दरोडा टाकण्यात आला दरोडेखोराने तब्बल १४ कोटीचे सोन्या-चांदीचे दागिने लुटले आहेत त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पदके रवाने झाली आहे. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी दरोडेखोरांनी गुन्ह्यात वापरलेली वाहने वेगवेगळ्या ठिकाणी सोडून दिली आहेत. एक दुचाकी मिरज बायपास रस्ताला तर सफारी गाडी रत्नागिरी नागपूर महामार्गावरील भोसे येथे सोडल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी ही दोन्ही वाहने जप्त केली आहेत.मार्केट यार्डजवळ वसंत काॅलनीत रिलायन्स ज्वेल्स हे सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे शोरूम आहे. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास पाच ते सहा दरोडेखोर एका वाहनातून आले. पोलिस असल्याचे सांगत त्यांनी बंदुकीचा धाक दाखविला. कर्मचाऱ्यांचे हात, पाय, तोंड चिकटपट्टीने बांधले. शोरूममधील दोघांना शोकेसमधील सोने-चांदीचे दागिने बॅगेत भरण्यास सांगितले. अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत त्यांनी संपूर्ण शोरूम खाली केले. बॅगा घेऊन जाताना काचेच्या दरवाजावर गोळीबार केला. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली होती.दरोडेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची पथके सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बेळगाव जिल्ह्यात रवाना झाली आहे. दरम्यान पोलिस पथकाला गुन्ह्यात वापरलेली सफारी गाडी (एमच ०४ इटी ८८९४) सोमवारी रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील भोसे (ता. मिरज) येथील यल्लमा मंदिराच्या पिछाडीस सापडली. तर रविवारी रात्री एक पल्सर दुचाकी मिरज म्हैसाळ रस्त्यावरील बायपास रस्त्यावर सापडली. ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. पंचनामा करून दोन्ही वाहने जप्त केली आहेत.
दरोडेखोरांचा सांगली पोलिसांना गुंगारा, दोन वाहने जप्त; रिलायन्स ज्वेल्सवर भर दिवसा दरोडा टाकून १४ कोटीची लूट
By शीतल पाटील | Published: June 05, 2023 5:36 PM